होय ट्रॅक्टरच, पण वेग ताशी २४७ किमी

इंग्लिश ट्रॅक्टर निर्माती कंपनी जेसीबी जगभरात प्रसिद्ध आहे. ट्रॅक्टर हे प्रामुख्याने शेती कामासाठी, मालवाहतुकीसाठी किंवा काही ठिकाणी प्रवासासाठी सुद्धा वापरले जातात. ग्रामीण भागात ट्रॅक्टर मधून प्रवास ही नित्याची गोष्ट आहे. या वाहनाचा वेग बेताचा असतो हे आपण पाहतो. त्यामुळे अगदी उत्तम दर्जाचा ट्रॅक्टर किती वेगाने जाऊ शकेल याचा साधारण अंदाज बांधता येतो. कुणी जर स्पोर्ट्स कार्सच्या वेगाने ट्रॅक्टर धावू शकेल असे विधान केले तर आपण ते चटकन मान्य करणार नाही. पण आहे! जगात नामवंत स्पोर्ट्स कार्स पेक्षा वेगाने धावू शकणारा ट्रॅक्टर बनविला गेला असून त्याची निर्मिती जेसीबीनेच केली आहे.

ऑडीटी सेन्ट्रल न्यूज वेबसाईट वरील माहितीनुसार जेसीबीच्या फास्ट्रॅक टू ट्रॅक्टरने वेगाच्या बाबतीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जागा मिळविली आहे. या ट्रॅक्टरचा वेग ताशी २४७ किमी आहे. कंपनीला जगातील सर्वात वेगवान ट्रॅक्टर बनवून रेकॉर्ड करायचे होते त्यासाठी खास डिझाईन विकसित करण्यात आले. २०१९ मध्ये याची चाचणी केली गेली तेव्हा त्याने २ किमीचा प्रवास केला आणि त्याचा सरासरी वेग २१७ किमी तर टॉप स्पीड २४७ किमी होता.

या ट्रॅक्टरला ७.२ लिटरचे सहा सिलिंडर डीझेल मॅक्स इंजिन दिले गेले आहे. या ट्रॅक्टर चे वजन ५ टन म्हणजे ५ हजार किलो आहे. कंपनीचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर टीम बर्नहॉज म्हणतात, इतक्या जड वाहनाला सुरक्षित रीतीने टॉप स्पीड पर्यंत नेणे आणि नंतर स्लो करणे इतके सोपे काम नाही. यापूर्वी जेसीबीच्या फास्ट ट्रॅक ट्रॅक्टर ने २०१९ मध्ये १६६ किमी वेगाने जागतिक रेकॉर्ड केले होते. नव्या ट्रॅक्टरने कंपनीचे स्वतःचे रेकॉर्ड मोडले आहे.