युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यंदाचे ‘टाईम पर्सन ऑफ द ईअर’

अमेरिकेच्या प्रतिष्ठीत टाईम मासिकाने या वर्षी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची ‘पर्सन ऑफ द ईअर २०२२ ’ म्हणून निवड केली आहे. या आठवड्याच्या सुरवातीला टॉप टेन यादीत त्यांची निवड झाली होतीच पण अंतिम निवडीत नेमल्या गेलेल्या जज आणि जनमतातून झेलेन्स्की यांची निवड झाली.

रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर हल्ला चढवून युद्ध सुरु केले होते. हे युध्द झटक्यात संपेल असे अंदाज व्यक्त केले जात होते पण झेलेन्स्की यांनी रशिया विरुध्द ठाम भूमिका घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला. रशियन सेनेने काबीज केलेल्या शहरांवर युक्रेनने पुन्हा ताबा मिळविला. या नोव्हेंबर मध्ये रशियाला खरसोन शहरातून सैन्य माघारी घेण्याची वेळ आली. झेलेन्स्की यांचा दुर्दम्य आशावाद आणि जिद्द यामुळे युक्रेन पराभूत झाले नाही असे जाणकार सांगत आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्हर्च्युअल भाषण करताना झेलेन्स्की यांनी जगात दहशतवादाला जागा असता कामा नये असे वारंवार प्रतिपादन केले होते. रशियन हल्ल्यात ३२ हजार नागरी स्थाने आणि ७०० महत्वपूर्ण पायाभूत सुविधा मोठे नुकसान झाले आहे. जगात अन्यत्र काही देशांचे नेते हल्ले होताच देश सोडून पळून जाण्याचे प्रकार घडत असताना झेलेन्स्की युक्रेन मध्येच ठाम पाय रोवून उभे आहेत. रशियाने या युद्धात प्रामुख्याने रहिवासी वसाहतींना लक्ष्य केले असून केल्या गेलेल्या हल्ल्यात फक्त ३ टक्के हल्ले सैनिकी ठाण्यांवर केले गेले आहेत. बहुतेक हल्ले शहरी वसाहतींवर केले गेले आहेत.