भारताला सोसावे लागणार तीव्र उष्णतेचे चटके


नवी दिल्ली: जागतिक हवामान बदलामुळे भारताला आगामी काळात तीव्र उष्णतेचे चटके सोसावे लागणार आहेत. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या, बेकारी आणि पर्यायाने सकल राष्ट्रीय उत्पन्नात कमालीची घट असे दुष्परिणाम सोसावे लागतील, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ आणि केरळ राज्य सरकार यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात देण्यात आला आहे.

सध्याच्या काळातही उन्हाळ्याचा वाढता कालावधी, उष्णतेची वाढती तीव्रता, अवकाळी पाऊस आणि लहरी हवामान याचा अनुभव भारतीय नागरिक घेतच आहेत. तशात या अहवालाने भारताबरोबरच भारतीय उपखंडातील देशांची चिंता अधिक वाढली आहे.

आगामी काही वर्षात भारत आणि भारतीय उपखंडात उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे. विशेषतः सन 2035 आणि त्या पुढच्या २५ वर्षाच्या काळात या प्रदेशाला प्रचंड उन्हाळा सहन करावा लागणार आहे. या उष्णतेच्या लाटा सर्वसामान्य नागरिकांना सहन करण्याच्या मर्यादित असणार नाही असं निरीक्षणही यामध्ये नोंदविण्यात आले आहे.

कृषिप्रधान असलेल्या भारत देशात मोठी लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे शेतीची बहुतेक कामे दिवसाच्या वेळी केली जात असल्यामुळे उन्हाळ्याच्या लाटा आल्यास या कामांना खीळ बसणार आहे. अर्थातच शेती आणि शेतीविषयक अन्य रोजगारांमध्ये गुंतलेल्या लोकांच्या अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उल्लेखनीय घट होऊ शकते असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव अधिक असणार आहे. भारतातील एकूण कार्यक्षम मनुष्यबळाच्या तब्बल ७० टक्के मनुष्यबळ हे कोरड्या हवामानाच्या आणि उष्णतेने प्रभावित होऊ शकणाऱ्या भूभागात राहत असल्यामुळे भारतीयांच्या कार्यक्षमतेवर हवामानबदलाचा विपरीत परिणाम होऊ शकतो असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.