या देशात तरुणाईला नको लग्न, नको मुले बाळे

भारतात सध्या लग्न मोसम सुरु असून या काळात शेकडो हजारो विवाह संपन्न होत आहेत.मात्र असाही एक देश आहे जेथे तरुण मुले मुली लग्नासाठी तयार होत नाहीत. दक्षिण कोरिया मध्ये ही परिस्थिती असून तेथे गेले काही वर्षे विवाह दर खूपच कमी झाला आहे. यामुळे सरकार चिंतेत पडले आहे. लग्नाचे वय किती असावे याचे निर्णय सरकार घेऊ शकत असले तरी कुणाला विवाह करा अशी जबरदस्ती करू शकत नाही. यावर उपाय म्हणून येथील सरकारने विद्यापीठात विद्यार्थ्यांना डेटिंगवर जाणे बंधनकारक केल्याचे सांगितले जात आहे.

परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या २८ वर्षात देशात दर दोन मागे एक व्यक्ती अविवाहित असे प्रमाण होईल याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सांखिकी कार्यालयाच्या आकडेवारी नुसार २०२१ मध्ये सिंगल तरुणांची संख्या ७२ लाखांवर गेली असून २००० मध्ये हे प्रमाण १५.५ टक्के होते, ते २०२५ पर्यंत ४० टक्क्यांवर जाईल असा अंदाज आहे.

अन्य एका अहवालानुसार १८.८ टक्के जोडप्यांचा विवाह पाचच वर्षे टिकला तर १७.६ टक्के जोडपी अशीही आहेत ज्याच्या विवाहाला ३० किंवा वयाहून अधिक वर्षे झाली आहेत. देशात मंदी असल्याने चांगल्या नोकऱ्या नाहीत. खर्च वाढते आहेत यामुळे बहुतेक लग्नाळू लोकांत एकटेच राहणे आणि कुटुंबाची कुठलीच जबाबदारी नको अशी भावना वाढीस लागली आहे. १२ टक्के विवाहित जोडप्यांनी मुलांना सांभाळणे हे ओझे झाले असल्याचे मत व्यक्त केले आहे तर २५ टक्के तरुणांना जोडीदाराची गरज वाटत नाही असेही दिसून आले आहे.