मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल आत्मीयता आणि सौहार्द आहे. पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या सीमावादाला निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हवा दिली जात आहे, अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या प्रश्नामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दोन्ही राज्यांमध्ये सौहार्द कायम ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र कर्नाटकच्या लोकांमध्ये सौहार्द, वाद राजकीय स्वार्थापोटी: राज ठाकरे
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये सीमावाद जुना असला तरीही दोन्ही राज्यांच्या नागरिकांमध्ये परस्परांबद्दल आत्मीयता आहे कर्नाटक मधील अनेकांची कुलदैवत महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील अनेकांची कुलदैवत कर्नाटकात आहेत. दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक बंध बळकट आहेत.
कर्नाटक मध्ये सन 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून राजकीय लाभ उठवण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या सीमा वादाला अकारण हवा देण्यात येत आहे, असा आक्षेप ठाकरे यांनी घेतला. कर्नाटकातून हा प्रश्न चिघळवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे हे तर उघडच आहे. मात्र, महाराष्ट्रातून हे उद्योग कोण करत आहे याचा शोध मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. #अखंडमहाराष्ट्र pic.twitter.com/2Rq1XCGGHz
— Raj Thackeray (@RajThackeray) December 7, 2022
निव्वळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी उकरून काढलेल्या सीमावादामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील नागरिकांमध्ये वितुष्ट येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा आणि या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा काढावा अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.