लक्ष्मीची अशी झाली लॅक्मे इंडिया, बॉलीवूड तारकांचा यात मोठा वाटा

आज भारतातील ११० तर विदेशातील १०० हून अधिक शहरात मोठ्या दिमाखात सुरु असलेल्या लॅक्मे पार्लर्स बद्दल अधिक काही बोलायची गरज नाही. १९०० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या उद्योगाचा पाया १९५२ साली टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष जेआरडी टाटा यांनी घातला होता याची अनेकांना माहिती असेल. ७० वर्षांपूर्वी तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना नवीन उद्योग धोरणात एखादा भारतीय ब्युटी ब्रांड असावा असे वाटत होते आणि त्यांनी ही कल्पना जेआरडी टाटा यांना बोलून दाखविली. त्यानाही ही कल्पना फारच रुचली आणि त्यातून १९५२ साली देशातला पहिला ब्युटी ब्रांड जन्माला आला तो ‘लक्ष्मी’ नावाने.

बाजारात आल्यापासून या सौंदर्य प्रसाधनाची मागणी वाढू लागली पण तो पर्यंत जेआरडी टाटा यांना स्टील उद्योगाकडे अधिक लक्ष द्यावे लागल्याने त्यांनी हा ब्रांड विकून टाकायचा निर्णय घेतला. त्यासाठी देशातून तसेच विदेशातून अनेक कंपन्यांनी बोली लावल्या. पण अखेर हिंदुस्तान लिव्हरने हा ब्रांड विकत घेतला. जेआरडी यांना फ्रेंच भाषेचे फार प्रेम होते. त्यांची ही आवड लक्षात घेऊन लक्ष्मीचे लॅक्मे असे नाव बदलले गेले. लॅक्मे या फ्रेंच शब्दाचा अर्थ लक्ष्मी असाच आहे.

या ब्रांडच्या प्रसिद्धीसाठी बॉलीवूड तारकांचा मोठा हातभार लागला. सुरवातीच्या काळात हेमामालिनी, जयाप्रदा, रेखा ते आजच्या लेटेस्ट मृणाल ठाकूर, अनन्या पांडे यांच्या पर्यंत अनेक अभिनेत्रींनी लॅक्मेची ओळख घराघरात पोहोचवली. सुरवातीला उच्चभू वर्गासाठी मानली गेलेली ही सौंदर्यप्रसाधने आज सर्व सामान्य गृहिणी, मध्यमवर्गीयांच्या घरात सुद्धा दिमाखाने विराजमान आहेत. भारताची पहिली लॅक्मे गर्ल म्हणून मात्र श्यामोली वर्मा हिचे नाव घेतले जाते.