म्हणून चीन पेक्षा भारतात करोना वेगाने होतोय कमी

चीन मध्ये कोविड १९ चा प्रसार वेगाने होऊ लागला असताना भारतात मात्र कोविड केसेस लक्षणीय रित्या कमी होत आहेत आणि नवीन केसेस येण्याचा वेग सुद्धा अगदीच कमी आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशात २४ तासात फक्त १६५ नवीन केसेस आल्या तर उपचार घेणाऱ्यांची संख्या घटून ४३४५ वर आली. याच तुलनेत चीन मध्ये दिवसाला ३१ हजार नव्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत. ७ मे २०२१ रोजी भारतात संक्रमणाचा दर ४,१४,१८८ असा उच्चांकी होता.

या उलट चीन मध्ये एप्रिल महिन्यात सरासरी १ हजार नव्या केसेस येत होत्या आणि आता ही संख्या ३१ हजारावर गेली आहे. याविषयी तज्ञांचे असे म्हणणे आहे की, भारतात करोना केसेस कमी होत जाण्यामागे मिक्स डिसीज रेझिस्टंट म्हणजे अनेक व्हेरीयंट विरुद्ध भारतीयांच्या शरीरात निर्माण झालेली रोगप्रतिकार शक्ती आहे. शिवाय भारतीय बनावटीच्या करोना लसी अतिशय प्रभावशाली ठरल्या आहेत. भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याचाही उपयोग झाला आहे.

उलट चीन सरकारने शून्य कोविड नीती लागू केली आणि कडक निर्बंध लावल्याने तेथील नागरिकाच्या मध्ये इम्युनीटी तयार होऊ शकलेली नाही शिवाय चीनच्या कोविड लसी परिणामकारक ठरल्या नाहीत. करोना साथीवर पूर्वीपासून लक्ष ठेऊन असलेले गौतम मेनन सांगतात, भारतात लसीकरण होण्यापूर्वी ज्यांना संक्रमण झाले त्यांच्यात अँटीबॉडीज निर्माण झाल्या होत्या आणि संक्रमितांची संख्या मोठी असल्याने हर्ड इम्युनीटी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. तीन मोठ्या करोना लाटा भारतात येऊन गेल्या. त्यामुळे करोनाचे अनेक व्हेरीयंट आले तरी मोठ्या संखेने रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल होणे किंवा मृत्यू होणे असे प्रकार घडले नाहीत.

या उलट चीन मध्ये पूर्वीपासून कडक निर्बंध लागू केले गेले आणि ते सुरूच ठेवल्याने चीन मध्ये करोनाची मोठी लाट आली नाही. त्यांच्या लसीची गुणवत्ता कमी दर्जाची होती त्यामुळे तेथील नागरिकांना पुरेसे संरक्षण मिळाले नाही. त्याचा परिणाम आता दिसत असून लोक मोठ्या प्रमाणावर संक्रमित होऊ लागले आहेत.