पैसे काढताच फोटो सह बँक बॅलंस दाखविणारे अनोखे एटीएम

आज देश विदेशात सर्वत्र दिवसाचे चोवीस तास,आठवड्यांचे साती दिवस म्हणजे २४ x ७ कुठेही एटीएम मधून पैसे मिळू शकतात. एटीएमचा वापर करताना आपण आपला पिन नंबर तसेच बँकेतील शिल्लक रक्कम रांगेत मागे उभे असलेल्या व्यक्तीला दिसू नये याची पुरेपूर काळजी घेतो कारण सुरक्षेसाठी ते आवश्यक आहे. पण मियामी बीचवर मात्र एक अनोखे एटीएम बसविले गेले आहे. येथे तुम्ही पैसे काढले कि तुमचा बँक बॅलंस दिसतोच पण तुमचा फोटो क्लिक केला जातो आणि त्या फोटोवरून तुमचे रँकिंग सांगितले जाते. नवल म्हणजे या एटीएम मधून पैसे काढायला युजर्स मोठी गर्दी करत आहेत.

ब्रुकलीन आर्ट कलेक्शनने आर्ट बेसेलीन मियामी बीचवर हे एटीएम बसविले आहे. आपण खेळ मैदानांवर पाहतो तसा एक लीडरबोर्ड येथे बसविला गेला आहे. एटीएम वर लीडरबोर्ड बसविण्याचा हा बहुदा पहिलाच प्रकार असावा असे म्हटले जाते. न्यूयॉर्क च्या आर्ट कलेक्शन एमएससीएचएफने याच डिझाईन केले आहे. या लीडरबोर्डवर तुमचा फोटो, बँक बॅलंस आणि तुमचे रँकिंग दाखविले जाते. युजर्सना क्लासिक आर्केड गेमच्या हायस्कोर प्रमाणे हे दिसते. एटीएम कॅमेरा फोटोसह रँकिंग दाखवितो आणि मागे रांगेत उभे असेलेले अन्य ग्राहक सुद्धा तो पाहू शकतात. यात लीडरबोर्डच्या प्रथम क्रमांकावर २.९ दशलक्ष डॉलर्स सह एका व्यक्तीचा फोटो आहे.