सैन्यात भरती होण्यासाठी आईवडिलांपासून लपविली मोठी बातमी

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४३ व्या तुकडीची पासिंग आउट परेड नुकतीच पार पडली. यात राष्ट्रपतीं सुवर्णपदक विजेत्या गौरव यादवच्या आईवडिलांची छाती अभिमानाने भरून आली यात नवल नाही. पण याच गौरवने सैन्यात भर्ती होण्याच्या अदम्य इच्छेपायी आईवडिलांपासून त्याचे मोठे यश लपवून ठेवले होते. देशाचा सैनिक म्हणूनच आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहिलेल्या गौरवने एनडीएची प्रवेश परीक्षा दोन वेळा दिली आणि तिसऱ्या वेळी त्याची येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. तेव्हा त्याने गुपित ठेवलेली एक गोष्ट घरात सांगितली.

राजस्थानच्या अलवर येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गौरवचे शालेय शिक्षण हरियानाच्या रेवडी येथील केरळ पब्लिक स्कूल मधून झाले. शालेय अभ्यासात तो हुशार होताच पण खेळात सुद्धा प्रवीण होता. १० वी ला प्रथम क्रमांक आणि बारावीला ९६ टक्के गुण मिळाल्यावर त्याने आयआयटीची परीक्षा दिली खरी. पण मनातून सैनिक शिक्षण घेण्याची इच्छा गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे आयआयटी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्याने ही बातमी आईवडिलांना कळूनच दिली नाही. आणि जेव्हा एनडीए मध्ये प्रवेश घेतला तेव्हाच आयआयटी परीक्षा पास झालो होतो असे त्याने घरात सांगितले. अर्थात त्याने एनडीए मध्ये जे यश मिळविले त्यापुढे अन्य बाबी गौण ठरल्या असे त्याचा भाऊ विनीत सांगतो.

पासिंग आउट परेडच्या वेळी या मुलांची परेड पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले आणि गौरवच्या यशाने आमची छाती अभिमानाने फुलली असे त्यांचे आई वडील सांगतात.