या देशांत मतदान चाचण्यांवर आहेत प्रतिबंध

गुजराथ , हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पूर्ण झाल्यावर विविध वाहिन्यांवर मतदानोत्तर निकाल चाचण्या सुरु झाल्या आहेत. गेली काही वर्षे भारतात मतदानपूर्व आणि मतदानोत्तर चाचण्या (ओपिनियन पोल आणि एग्झीट पोल) आणि त्यातून केलेले अंदाज दिले जात आहेत. टीव्ही आणि डिजिटल मिडीयावर विविध संस्था यासाठी सर्व्हेक्षणे करतात. निवडणूक आयोगाने काही वर्षांपूर्वी या संदर्भात कडक नियम लागू केले आहेत. पण जगात असेही अनेक देश आहेत जेथे एग्झीट पोलवर प्रतिबंध आहेत.

अमेरिका आणि युरोपीय देशात फार पूर्वीपासून अश्या चाचण्या आणि त्यांचे निष्कर्ष जाहीर केले जात आहेत. भारतात याची सुरवात साधारण ३० वर्षांपूर्वी झाली. युरोपातील १६ देशांनी  पोल रिपोर्टिंगवर प्रतिबंध लावले आहेत. मतदानाच्या आधीचा दिवस ते मतदानापूर्वी एक महिना अशी त्यांची मुदत आहे. फ्रांस मध्ये मतदानाच्या अगोदर २४ तास ओपिनियन पोल रिपोर्ट देता येत नाहीत. इटली, स्लोवाकिया, लाग्झेम्बर्ग देशात ही मुदत सात दिवस अगोदर अशी आहे.

ब्रिटन मध्ये अशी बंदी नाही. अमेरिकेत ओपिनियन पोल कधीही घेता येतात मात्र एक्झिट पोल मतदान पूर्ण झाल्यावर घेता येतात. जर्मनी मध्ये मतदानापूर्वी चाचण्या रिपोर्ट देणे हा गुन्हा आहे तसेच बुल्गारिया मध्ये मतदानाच्या दिवशी चाचण्या रिपोर्ट देणे गुन्हा मानला जातो. सिंगापूर मध्ये मात्र ओपिनियन आणि एग्झीट दोन्ही चाचण्यांवर बंदी आहे. भारतात मतदान पूर्ण झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आणि मतदानाची टक्केवारी जाहीर केली कि मगच एग्झीट पोल चाचण्या घेता येतात.