हैद्राबाद मध्ये सुरु झाले देशातले पहिले गोल्ड एटीएम

ऑटो टेलर मशीन म्हणजे एटीएम ही आता नवलाची गोष्ट राहिलेली नाही. देशात ठिकठिकाणी अनेक बँकांची एटीएम बसविली गेली आहेत आणि त्यातून हव्या त्या वेळी ग्राहक पैसे काढू शकतात. पण आता एटीएम मधून सोन्याची नाणी सुद्धा मिळू शकणार आहेत. देशातील पहिले गोल्ड एटीएम तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथे सुरु झाले आहे. हैद्राबादची कंपनी गोल्ड सिक्का ने ओपन क्यूब टेक्नोलॉजीच्या मदतीने हे एटीएम सुरु केले आहे.

यातून ग्राहक क्रेडीट किंवा डेबिट कार्डचा वापर करून सोन्याची नाणी खरेदी करू शकणार आहेत. ०.५ ग्राम पासून १०० ग्राम वजनाची नाणी यातून खरेदी करता येतील. सोन्याचे त्यावेळचे दर लाइव दिसणार असून ही एटीएम २४ तास उघडी राहणार आहेत. कंपनीचे सीईओ सी तरुण म्हणाले हैद्राबाद पाठोपाठ पेद्दावल्ली, वरंगळ, करीमनगर येथेही अशी एटीएम बसविली जात आहेत. पुढच्या दोन वर्षात संपूर्ण भारतात अशी ३००० एटीएम बसविण्याची कंपनीची योजना आहे.

देशातील पहिले ग्रेन एटीएम म्हणजे धान्य देणारे एटीएम हरियाना गुरूग्राम मध्ये सुरु झाले असून त्यामुळे रेशनवर कमी धान्य मिळण्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. या एटीएम मधून रेशन लाभार्थी योग्य वजनाचे धान्य घेऊ शकतात.