म्हणून चित्रपटात काम करण्यास राजी नसते मलाइका

पहिल्या वहिल्या चित्रपटात रेल्वे गाडीच्या टपावर छैया छैया नृत्याने खास लक्ष वेधून घेतलेली मलाईका त्यानंतर चित्रपटात फारशी दिसली नाही. मात्र अनेक टीव्ही शो मधून तिने अमाप लोकप्रियता मिळविली. तिचा खास चाहता वर्ग निर्माण केला आणि आजही आपल्या अतिशय सुडौल बांध्यामुळे ती नेहमीच चर्चेत आहे. तिचा नवीन शो ‘मुव्हिंग इन वुईथ मलाईका’ चा पहिला एपिसोड टीव्हीवर नुकताच सादर झाला. या निमित्ताने तिने मैत्रीण फराह खान हिच्यासोबत व्यावसायिक आणि खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणी गप्पा मारल्या.

फराहने जेव्हा तिला विचारले कि चित्रपटांची स्क्रिप्ट का टाळतेस तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना मलाईका म्हणाली, स्क्रिप्ट टाळत नाही पण खरे सांगायचे तर अनेक लोक भोवती असताना डायलॉग बोलायची कला मला अवगत नाही. त्यात अभिनय करून संवाद बोलायचा असेल तर मुळीच जमत नाही. त्यामुळे मी चित्रपटांपासून दूर आहे. अरबाज खानबद्दल बोलताना ती म्हणाली, आमचे नाते छान होते पण दबंग चित्रपटानंतर आमचे पटेनासे झाले. वादावादी होऊ लागली.

विशेष म्हणजे छैया छैया गाण्यासाठी शाहरुख बरोबर काम करण्यासाठी पहिली पसंती मलाईका नव्हती असे फराह खानने यावेळी सांगितले. ती म्हणाली पाच वेगवेगळ्या अभिनेत्रींना ऑफर दिली होती. शिल्पा शेट्टी, शिल्पा शिरोडकर यांना विचारले होते पण ट्रेनवर डान्स करायची त्यांची तयारी नव्हती. मलाईकाची निवड केली तेव्हा तिच्याबद्दल कुणालाच खात्री नव्हती पण तिने फार उत्तम डान्स करून लोकप्रियता मिळविली.