एग्झीट पोल विश्वसनीय आहेत का?
लोकसभा किंवा विधानसभा मतदान पार पडले कि मतदानोत्तर चाचण्यांचे रिपोर्ट प्रसिद्ध होऊ लागतात, त्यावर टीव्ही वर चोवीस तास चर्चा सुरु होतात पण अनेकांच्या मनात हे रिपोर्ट खरच विश्वसनीय असतात का असा प्रश्न आहे. काही लोकांच्या मते हा फक्त प्रचार आणि जाहिरातीचा भाग असतो तर काही जणांच्या मते यातून निकालाचा अंदाज करता येतो.
एग्झीट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचण्या. मतदान संपल्यावर मतदान केंद्रातून मतदान करून आलेल्या मतदारांची बोलून घेतलेला अंदाज असे म्हणता येईल. पण मतदार किती खरे सांगतात, यावर हे अंदाज खरे ठरतील का चुकणार हे ठरत असते. अनेकदा हे अंदाज पूर्ण चुकीचे ठरल्याचे दिसते तर बरेच वेळा हे अंदाज बरेचसे बरोबर आल्याचे दिसते. यासाठी काही खास संस्था काम करत असतात.
जनप्रतिनिधीत्व कायदा १९५१ कलम १२६ सी नुसार मतदारांवर प्रभाव पडेल किंवा मतदारांच्या निर्णयावर प्रभाव पडेल असा कुठलाही अहवाल मतदानादरम्यान प्रसिद्ध करता येत नाही. ओपिनियन पोल हे मतदानाच्या अगोदर घेतले जातात आणि एग्झीट पोल मतदानाच्या नंतर घेतले जातात. २०१४ मध्ये यावर बंदी घातली गेली होती. जागतिक पातळीवर या पोल्सवर फारसा विश्वास ठेवला जात नाही.
१९६७ मध्ये डच समाजशास्त्रज्ञ मार्सेल वानडेन याने त्याच्या देशात प्रथम असे प्रयोग केले होते आणि त्याच वर्षी अमेरिकेत राज्य निवडणुकात यावर प्रयोग केले गेले. पण १९४० सालापासून हे शास्त्र वापरले जात होते असे सांगतात. भारतात यांची सुरवात प्रणय रॉय यांनी केल्याचे मानले जाते.