५ डिसेंबर जागतिक मृदा दिवस

अन्नदाता, जागतिक मृदा (माती) दिवस ५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा एक महत्वपूर्ण दिवस मानला जातो. मातीचे महत्व, तिची गुणवत्ता या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस साजरा होतो. माती आपली अन्नदाता मानली जाते. प्रदूषण आणि कीडनाशकांच्या अति वापराने आणि अफाट जंगलतोडी मुळे मातीची गुणवत्ता कमी होते आहे आणि त्यामुळे जगापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. मातीची सुपीकता कमी होते आहे आणि खाद्यान्न सुरक्षेचा मोठा प्रश्न जगापुढे आहे. मातीचे महत्व पटवून देणे, मृद संधारण म्हणजे मातीचे जतन हे मोठे आव्हान आहे.

यासाठीच वर्ल्ड सॉईल डे २०१४ पासून साजरा होत आहे. या वर्षीची थीम ‘ सॉईल व्हेअर फूड बिगिन्स’ अशी आहे. आरोग्यपूर्ण इको सिस्टीम, मानवासाठी आरोग्यदायी वातावरण अशी यामागची कल्पना आहे. २००२ साली इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सने वर्ल्ड सॉइल डे चा प्रस्ताव मांडला होता. मात्र तो मंजूर होण्यास २०१३ साल उजाडावे लागले. फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने ६८ व्या संयुक्त राष्ट्र महासभेत पुन्हा त्याविषयी आग्रह धरला. त्यानंतर ५ डिसेंबर २०१४ रोजी त्याची अधिकृत घोषणा केली गेली.

या दिवसासाठी ५ डिसेंबर ही तारीख ठरविण्या मागचे कारण म्हणजे थायलंडचे दिवंगत राजे भुमिबोल अदुल्यासेन यांचा हा जन्मदिवस. जागतिक मृदा दिन साजरा व्हावा यासाठी भुमिबोल यांनी मोठे योगदान दिले होते.