म्हणून खेळाडूमध्ये टॅटूची मोठी क्रेझ

फिफा वर्ल्ड कप २०२२ चा खुमार जगाला व्यापून राहिला आहे. कतार येथे होत असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबरला होणार आहे. जगभरातील लाखो फुटबॉल चाहते या दिवसाची प्रतीक्षा करत आहेतच पण कतार येथे उपस्थित राहिलेले फुटबॉल चाहते सुद्धा आपापल्या आवडत्या खेळाडूं प्रमाणे शरीरावर टॅटू काढून घेऊ लागले आहेत. मेस्सी, नेमार प्रमाणे टॅटू काढून घेण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

एकंदरीत फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, अॅथलेटिक्स अश्या सर्व खेळात चमकणारे खेळाडू शरीराच्या विविध अवयवांवर टॅटू काढून घेताना दिसतात. त्यामागे काही मेसेज असतो, प्रियजनाच्या आठवणी असतात तर काही खास फायदे सुद्धा असतात. अॅक्यूपंक्चर तज्ञ सांगतात, हातावर टॅटू काढण्याने शरीरातील ऑक्सिजन पातळी चांगली राहते, गुडघ्याखालच्या भागात टॅटू काढले तर स्टॅमिना वाढतो. स्टेरॉईड घेण्यापेक्षा नैसर्गिक रित्या हे काम होते. अर्थात त्यासाठी मशीनने नाही तर हाताने सुईच्या सहाय्याने हे काम करणे आवश्यक असते.

पाठीचे दुखणे असेल तर सर्व्हायकल टॅटू उपयुक्त ठरतात. स्ट्रेस, डिप्रेशन असेल तर कपाळावर आज्ञाचक्र असते तेथे टॅटू काढला जातो. टॅटू म्हणजे गोंदण, ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली प्रथा आहे. ५ हजार वर्षापूर्वी इजिप्त मध्ये सापडलेल्या ममीवर सुद्धा टॅटू मिळाले आहेत. ही मुळातली चीनी चिकित्सा पद्धत म्हटली जाते. ठराविक ठिकाणी गोंदविले कि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते असा दावा केला जातो. सुया टोचून गोंदण काढले कि शरीरात अँटीबॉडीज तयार होतात असे मानतात.

अमेरिकेत मृताच्या शरीरावर टॅटू असतील तर ते काढून त्याची फ्रेम करायची आणि त्याची आठवण जपायची असाही प्रकार सुरु आहे. एका छोट्या फ्रेमसाठी दीड लाख रुपये खर्च येतो. नाझी सैनिक कैद्यांच्या हातावर त्यांचे नंबर गोंदवून ठेवत असत.

फिफा मध्ये आर्जेन्टिनाचा कप्तान मेस्सी याचे टॅटू चर्चेत आहेत. या टॅटूचे कनेक्शन त्याच्या परिवाराशी आहे. त्याच्या पाठीवर आईचे पोर्ट्रेट आहे तर डाव्या पायवर मुलाच्या हाताचा टॅटू आहे. शिवाय १० नंबर म्हणजे त्याच्या जर्सीचा नंबर आहे. उजव्या पायावर तिन्ही मुलांच्या जन्मतारखा आणि नावे आहेत. खांद्यावर येशू आहे तर कमरेवर लाल रंगाचा ओठांचा टॅटू आहे. हा त्याच्या पत्नीची आठवण आहे.

ब्राझीलच्या नेमारच्या शरीरावर ४० टॅटू आहेत. डच फुटबॉलर मेम्फिस डीपे याला किंग ऑफ टॅटू म्हटले जाते. टीम इंडियाचे विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार, शिखर धवन, के एल राहुल, रविंद्र जडेजा यांच्या शरीरावरचे टॅटू सुद्धा चर्चेत असतात.