मुंबई: भारतीय क्रिकेट संघाची विशेषत: टी २० च्या प्रकारात होत असलेली पीछेहाट लक्षात घेता या प्रकारासाठी नवा कर्णधार आणि नवा प्रशिक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
भारतीय टी 20 संघासाठी नेमणार नवा प्रशिक्षक आणि कर्णधार?
भारतीय क्रिकेट संघाला टी 20 विश्वचषक, आशिया चषक आणि विदेशी दौऱ्यांमध्ये विशेषतः टी 20 या प्रकारात सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे टी 20 संघाच्या कर्णधार पदावरून रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक पदावरून राहुल द्रविड यांची गच्छंती होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
टी ट्वेंटी हा गतिमान क्रीडा प्रकार आहे. त्याचे वेळापत्रकही अधिक व्यग्र आणि गतिमान असते. त्यामुळे एकाच व्यक्तीला टी 20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व करणे आणि प्रशिक्षक पदाची जबाबदारी निभावणे कठीण असल्याचे नियामक मंडळाच्या लक्षात आले आहे. अर्थातच टी 20 संघासाठी नवा प्रशिक्षक आणि नवा कर्णधार नियुक्त करण्याचा विचार नियमक मंडळ गांभीर्याने करत आहे.
हार्दिक पंड्या याच्याकडे टी 20 संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र या संघाच्या प्रशिक्षकपदी नेमके कोण असावे, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. प्रशिक्षक निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून नियामक मंडळ नव्या वर्षाच्या सुरुवातीला टी 20 संघाला नवीन प्रशिक्षक आणि नवीन कर्णधार देईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय क्रिकेट संघातील माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी प्रशिक्षक कर्णधार रवी शास्त्री यांनीही टी 20 संघाला वेगळा कर्णधार आणि वेगळा प्रशिक्षक असावा अशी सूचना यापूर्वीच केली आहे.