किंग चार्ल्स थर्डच्या शाही मुकुटात होणार बदल

ब्रिटनचे राजे चार्ल्स थर्ड यांचा राज्याभिषेक सोहोळा ६ मे २०२३ मध्ये होणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे. १७ व्या शतकातील सेंट एडवर्ड मुकुटात त्यासाठी काही बदल केले जाणार असल्याचे समजते. बकिंघम पॅलेसच्या राजपरिवाराचा हा खास मुकुट संग्रहालयातून शनिवारी हलविला गेला असल्याचे समजते. पूर्ण सोन्याच्या या मुकुटात माणिक, नील, पाचू, पुष्कराज, हिरे अशी अनेक मौल्यवान रत्ने जडविली गेली आहेत. राज्याभिषेक सोहोळ्यात वेस्टमिन्स्टर अॅबे मध्ये हा मुकुट राजे चार्ल्स थर्ड यांना घातला जाईल. लंडन टॉवर येथे राज प्रतीकांचा मोठा संग्रह असून येथे रोज सरासरी १० लाख लोक भेट देतात.

या मुकुटात जांभळ्या रंगाची मखमलीची टोपी आहे. हा मुकुट अतिशय जड म्हणजे २.२३ किलो वजनाचा आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी १९५३ मध्ये राजगादीवर बसताना हा मुकुट घातला होता. गेली शेकडो वर्षे हा मुकुट फक्त राज्याभिषेकाच्या वेळीच घातला जातो. १९११ मध्ये किंग जॉर्ज पंचम राजा बनले तेव्हा हा मुकुट थोडा हलका बनविला गेला होता. किंग चार्ल्स वेस्टमिन्स्टर अॅबे मधून समारोह उरकून बाहेर येतील तेव्हा हा मुकुट काढून त्याजागी आधुनिक इम्पिरियल स्टेट क्राऊन परिधान करतील. संसद उद्घाटन सारख्या कार्यक्रमात हा मुकुट घालता जातो. यात २ हजार पेक्षा जास्त हिरे बसविले गेले असून १९३७ मध्ये महाराणी एलीझाबेथ द्वितीयचे वडील किंग जॉर्ज सहावे यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी तो बनविला गेला आहे.