मुलांची नावे बॉम्ब, गन, सॅटेलाईट ठेवण्याचे उत्तर कोरियात आदेश

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्या मनात कधी काय येईल आणि तो कुठले नवे आदेश जनतेसाठी लागू करेल याचा अंदाज कुणीच करू शकत नाही. किम जोन उन सरकार कडून आता नवा अजब आदेश जारी केला गेला आहे. त्यानुसार मुलांची नावे ठेवताना ती देशभक्तीने ओतप्रोत असली पाहिजेत. हा आदेश डावलला तर दंड केला जाणार आहे. सरकारने सुचविलेल्या काही नावामध्ये बॉम्ब, गन, सॅटेलाईट अशी नावे आहेत. कोरियन भाषेनुसार पॉक टू म्हणजे बॉम्ब, चुंग रिम म्हणजे इमानदारी, यु सॉंग म्हणजे सॅटेलाईट.

विशेष म्हणजे ज्या मुलांचे नामकरण नुकतेच केले गेले आहे त्यांची नावे सुद्धा बदलायची असून त्यासाठी या महिना अखेर मुदत दिली गेली आहे. यापूर्वी कम्युनिस्ट सरकारने दक्षिण कोरियाप्रमाणे  ए री म्हणजे प्रेम करण्यास योग्य, सु मी म्हणजे अतिसुंदर अशी नावे ठेवण्यास परवानगी दिली होती. पण नव्या आदेशानुसार मुलांची नावे क्रांतिकारी हवीत.

काही नागरिकांनी गुपचूप दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या या नव्या आदेशाने नागरिक नाराज झाले आहेत. स्वतःच्या मुलाचे नाव आपल्या आवडीप्रमाणे ठेवण्याचे स्वातंत्र सरकारने हिरावून घेतल्याची भावना त्यांच्यात आहे.