अत्याधुनिक बी २१ रायडर बॉम्बर अमेरिकी हवाईदलात सामील

शुक्रवारी अमेरिकेच्या हवाई दलात जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान बी २१ रायडर सामील केले गेले. लढाऊ विमानातील सर्वात छोट्या आकाराच्या या विमानाची क्षमता मात्र प्रचंड आहे. फ्रांसची राफेल ४.५ जनरेशनची आहेत तर बी २१ सहाव्या जनरेशनचे विमान आहे. रडार, इन्फ्रारेड, सोनार अशी अत्याधुनिक यंत्रे सुद्धा या विमानाचा माग घेऊ शकत नाहीत. पारंपारिक तसेच अत्याधुनिक अण्वस्त्रे वाहून नेण्याची या लढाऊ विमानाची क्षमता आहे. अस्मानी लढाईत हे विमान सर्वात अत्याधुनिक असल्याचा दावा निर्माती कंपनी नोर्थ्रोप ग्रुमनने केला आहे.

हे डिजिटल बॉम्बर विमान आहे. म्हणजे ते पायलट विना सुद्धा ऑपरेट करणे शक्य आहे. क्लाउड तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या या विमानावर समजा हल्ला झाला तरी त्यातील डेटा सुरक्षित राहतो. या बॉम्बर विमानाचे डिझाईन असे आहे कि भविष्यातील कुठल्याही धोक्यापासून ते निपटू शकते. नवे सोफ्टवेअर लावले कि पुन्हा अपडेट करता येते. या विमानासाठी ८ हजार एअरो तज्ञांच्या टीमने दीर्घकाळ काम केले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जगातील कुठल्याही भागाची टेहळणी, हेरगिरी, देखरेख, बी २१ रायडर करू शकते. इलेक्ट्रोनिक हल्ला झेलण्यास ते सक्षम आहे. दीर्घ काळाच्या लढाईसाठी ते उत्तम आहे. या विमानाचा वेग ताशी ३६०० किमी असून जगात कुठेही हल्ला करण्याची त्याची क्षमता आहे. या विमानाची किंमत १६ हजार कोटी आहे. अमेरिकेने सध्या अशी ६ विमाने खरेदी केली आहेत. राफेलची किंमत ७१६ कोटी असून त्याची मारक क्षमता ३७०० किमीची आहे. बी २१ रायडरच्या डिझाईनची नक्कल चीन, रशिया कडून केली जाऊ नये म्हणून या विमानाचे खरे फोटो प्रसिद्ध केले गेलेले नाहीत. जे फोटो आहेत ते काल्पनिक आहेत असे सांगितले जात आहे.