न्यूयॉर्क प्रशासनाला हवाय एक पुंगीवाला, १ कोटी पेक्षा जास्त पगार

न्यूयॉर्क हे अमेरिकेतील अतिगर्दीचे शहर सध्या उंदरांच्या त्रासाने हैराण झाले आहे. त्यामुळे न्यूयॉर्क महापौरांनी एक जाहिरात प्रसिद्धीस दिली असून त्यांना या उंदरांचा नायनाट करू शकेल असा एक तज्ञ हवा आहे. बालपणीची एक कथा येथे आठवते. एका गावात असेच खूप उंदीर झाल्यामुळे तेथील गावकऱ्यांनी बक्षीस लावले होते. तेव्हा एका पुंगीवाल्याने ते आव्हान स्वीकारले आणि जादूच्या पुंगीने सर्व उंदीर गावाबाहेर काढून नदीत बुडविले. तसाच पुंगीवाला या मेयरना हवा आहे. योग्य उमेदवारासाठी अर्ज मागविले गेले असून त्याल वर्षाला १,७०,००० डॉलर्स म्हणजे १ कोटी १३ लाख वेतन देण्यात येणार आहे.

न्यूयॉर्क शहरात अंदाजे प्रत्येक व्यक्तीमागे दोन उंदीर असे प्रमाण आहे. २०१४ च्या आकडेवारी नुसार शहरात किमान १ कोटी ८० लाख उंदीर होते. तेथील महापालिकेने आत्तापर्यंत उंदीर निर्मूलनावर लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. महापौर एरिक अॅडम्स यांनी या संदर्भात एक संदेश दिला आहे. त्यानुसार त्यांना उंदरांची किळस वाटते, द्वेष वाटतो त्यामुळे काही उंदीर मारले जाणार आहेत.डेली मेलच्या बातमीनुसार पालिकेकडे बजेट कमी असल्याने आठवड्यापूर्वी ४७०० पदे कमी केली गेल्यावर नवी जाहिरात दिली गेली आहे. त्यात उंदीर उपद्रव कमी करण्यासाठी तज्ञ हवा आहे. उमेदवार पदवीधर, खऱ्या शत्रूशी लढण्याचा दृढ संकल्प हवा आणि हत्या करण्याच्या मनोवृत्तीचा हवा. येथील उंदीर चलाख आणि जिवंत राहण्याचे कौशल्य मिळविलेले आहेत. पण शहर आम्ही चालवितो, ते नाही.’ असे म्हटले गेले आहे.

उंदरांच्या उपद्रवामुळे नागरिकांसाठी कायदे बदलण्याचा विचार सध्या सुरु असून रात्री आठ पूर्वी कुणीही घरातील कचरा बाहेर ठेऊ नये असा नियम केला जाणार आहे. सध्या दुपारी चार नंतर कधीही कचरा बाहेर ठेवता येतो. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्या आठ महिन्यात उंदरासंबंधीच्या तक्रारीतील ७० टक्के तक्रारीची दखल घेतली गेल्याचे सांगितले जात आहे.