गुजराथ मध्ये ही आहेत रहस्यमयी स्थळे
गुजराथचा विकास करताना पर्यटन क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले गेल्याने हे राज्य देशातील लोकप्रिय पर्यटन राज्य म्हणून नावारूपास येत आहे. सध्या येथे विधानसभा निवडणुकांची धामधूम आहे. गुजराथ मध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत तसेच अश्याही काही जागा आहेत ज्या रहस्यमयी मानल्या जातात. अनेक गुजराथी लोकांना सुद्धा त्याबाबत माहिती नाही.
सुरत येथील दुमरा बीच हे ठिकाण दिवसा कितीही रम्य वाटले तरी रात्री मात्र तेथे कुणी फिरकत नाही. या किनाऱ्यावर भुताटकी असल्याचे सांगितले जाते. तसा अनुभव अनेकांनी घेतला आहे. फार पूर्वी येथे कब्रस्थान होते असे म्हणतात. त्यामुळे हा किनारा रात्री भयानक वाटतो. या उलट उन्नई हे स्थळ ऐतिहासिक महत्वाचे आहे. येथे उन्नई माता नावाचे प्रसिद्ध स्थळ आहे तसेच येथे एक तलाव असून त्यातील पाण्यामुळे सर्व रोग दूर होतात अशी श्रद्धा आहे. या तलावाचे पाणी वर्षभर गरम असते हाही एक चमत्कार आहे.
करीयाणां या छोट्याश्या गावात जादूचे दगड मिळतात. म्हणजे या दगडातून विचित्र आवाज ऐकू येतात. तुलसी श्याम या गावी एक भव्य मंदिर आहे आणि येथेच १५० मीटर लांबीचा एक रस्ता आहे ज्यावर गुरुत्वाकर्षण नियम लागू होत नाहीत. म्हणजे या रस्त्यावर गाड्या चढावर सहज चढतातच पण पाणी सुद्धा वरच्या दिशेने जाते. गीर अभयारण्याजवळ हे ठिकाण आहे.
काला डुंगर हे कच्छच्या रणातील एक ठिकाण. हा या वाळवंटातील सर्वात उंच पॉइंट आहे. याचे रहस्य म्हणजे जो कुणी येथे पळतो, त्याचा वेग आपोआप वाढतो असा अनुभव येतो.