बौद्ध धर्मगुरू लामा यांचा असा घेतला जातो शोध

हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पिती भागात बालवाडीत शिकणाऱ्या चार वर्षाच्या रापतेन निंगमा नावाच्या बालकाला रिनपोचे यांचा चौथा जन्म म्हणून मान्यता दिली गेली असून या बालकाला सिमला येथील दोरजी मठ प्रमुखपदावर बसविले गेल्याची बातमी नुकतीच आली आहे. अर्थात या बालकाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला धर्मगुरू म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल. हिंदू आणि जैन धर्मियांप्रमाणेच बौद्ध धर्म पुनर्जन्म मानतो. बौद्ध धर्मात धर्मगुरूच्या निवड प्रक्रियेत पुनर्जन्म महत्वाची भूमिका पार पाडतो. रापतेन याची संप्रदाय प्रमुख म्हणून निवड झाली आहे. तिबेटी बौद्ध धर्मात चार शाखा असून त्यातील निंगमा संप्रदाय हा सर्वात जुना संप्रदाय मानला जातो.

बौद्ध धर्माचे प्रमुख दलाई लामा आणि अन्य प्रमुख धर्मगुरू यांची निवड प्रक्रिया एकसारखीच असते. भगवान बुद्धाचे वारसदार दलाई यांचा अंतिम काळ जवळ येताच ते आपण पुढचा जन्म कुठे घेणार याचे संकेत देतात. तसेच अन्य बौद्ध धर्मगुरू सुद्धा ते पुढचा जन्म कुठे घेणार याच्या काही खुणा सांगतात. त्यानुसार नव्या लामाचा शोध सुरु होतो. हजारो लाखो बालकातून हा शोध घेणे अवघड असते. लामा जेव्हा मृत्यू पावतात, साधारण त्याच वेळी नवीन बालके कुठे जन्माला आली याचा तपास केला जातो. हा शोध घेण्यास कित्येक वर्षे जातात. काही संकेत मिळाले कि त्या बालकांमध्ये लामा लक्षणे शोधली जातात. ही एक परीक्षा असते. या मुलांना संबंधित धर्मगुरूच्या काही वस्तू ओळखता याव्या लागतात. काही आठवणी सांगाव्या लागतात आणि मागच्या जन्मात घडलेले काही प्रसंग सांगावे लागतात. सध्याचे दलाई लामा दोन वर्षांचे होते तेव्हाच त्यांची निवड केली गेली होती.

हिमाचलचा स्पिती मधील रंग्रिक गावात जन्माला आलेल्या रापतेनची मागणी जेव्हा लामा पथकाने केली आणि तो रिनपोचे यांचा पुनर्जन्म असल्याचे सांगितले गेले तेव्हा त्याची आई केसंग डोल्मा आणि वडील सोनम यांना अतिशय आनंद झाला. आपल्या पोटी महान साधूंचा जन्म झाला अशीच त्यांची भावना होती. रिनपोचे यांचा मृत्यू २०१५ मध्ये झाला होता आणि त्यावेळीच त्यांनी ते पुढचा जन्म कुठे घेणार याचे संकेत दिले होते. त्यानुसार रापतेनचा शोध घेण्यात आला असून आता तो लामाच्या सोबत राहणार आहे.