पारंपारिक वेशभूषेत सिद्दी समुदायाचे स्वतंत्र बूथवर उत्साहात मतदान

गुजराथ विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडले असून या भागात ६० टक्के मतदान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. यावेळी विशेष चर्चेत राहिलेले ठिकाण म्हणजे जम्भूर गाव. मिनी आफ्रिका अशी ओळख असलेल्या या गावातील सिद्दी समुदायाने यावर्षी प्रथमच खास त्यांच्यासाठी उभारलेल्या विशेष आदिवासी मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहाने मतदान केले. हे मतदार त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत मतदानासाठी आले होते.

या गावातील रहिवासी मूळ आफ्रिकेतील आहेत. गेली अनेक शतके ते येथे राहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जुनागढचा किल्ला बांधला जात होता तेव्हा तेथील नबाबाने आफ्रिकेतील गुलाम, मजूर कामासाठी येथे आणले. तो काळ १५८८ ते १५९३ हा आहे. हे लोक येथे आले आणि कायमचे येथीलच झाले. आता त्यांच्या चौथ्या, पाचव्या पिढ्या येथे राहत असून ते गुजराथी भाषा बोलतात पण सण उत्सव मात्र आफ्रिकेतील प्रथेप्रमाणे साजरे करतात. सिद्दी आदिवासी अशी त्यांची ओळख आहे.

निवडणूक आयोगाने प्रथमच त्यांना विशेष बूथवर मतदानाची सुविधा दिल्याचा आनंद रेहमान या रहिवाश्याने व्यक्त केला. जम्बुर गावात ३४८१ मतदार असून त्यातील ९० टक्के सिद्दी समुदाय आहे. या मतदानाचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.