विमानतळावर चेहरा हाच बनणार बोर्डिंग पास

एक डिसेंबर पासून देशात विमानतळावर डीजी प्रवास योजना सुरु झाली असून विमानतळावर एन्ट्री घेताना आता बोर्डिंग पासची गरज राहणार नाही. फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाने प्रवाशाची ओळख पटविली जाणार आहे. ही पूर्ण पेपरलेस व्यवस्था आहे. विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी गुरुवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या सेवेचे उद्घाटन केले. सध्या ही सेवा दिल्ली, बंगलोर, वाराणसी शहरात सुरु झाली असून याचा दुसरा टप्पा मार्च २०२३ पासून हैद्राबाद, पुणे, विजयवाडा, कोलकाता येथे सुरु होणार आहे.

यामुळे विमानतळावर प्रवेश, सुरक्षा तपासणी फक्त चेहऱ्यावरून केली जाणार आहे. त्यामुळे प्रवेश जलद आणि सहज होऊ शकेल. त्यासाठी लांब रांगा आणि कागदपत्रे बरोबर बाळगावी लागणार नाहीत. विमानतळाच्या ई गेटवर बारकोड बोर्डिंग पास स्कॅन करून फेस रेकग्निशन मदतीने प्रवाशाची ओळख पटविली जाणार आहे. त्यासाठी डीजी यात्रा अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.

या अॅप मध्ये प्रवाशाने माहिती भरताना सेल्फ इमेज- आधार व्हॅलीडेशन करायचे आहे. व्हेरिफिकेशन झाल्यावर ओटीपी येणार तो भरायचा आहे. मग लॉग इन करून विमानतळावर वेबचेक तिकीट अॅपवर डाऊनलोड करायचे आहे. यात प्रवाशांना माहिती द्यावी लागणार असली तरी त्यांची माहिती पूर्ण सुरक्षित असेल असा दावा केला जात आहे. स्कॅन केल्यानंतर २४ तासात माहिती काढून टाकली जाणार आहे असेही सांगितले जात आहे.