कोट्याधीश भिकारी, महिना कमाई लाखोंची

जगातील बेघर पण सर्वात श्रीमंत भिकारी पाहायचा असेल तर तुम्हाला लंडन भेटीवर जावे लागेल. रस्त्यांवर अगदी गबाळ्या आणि घाणेरड्या वेशात फिरणारा, रस्त्यावरच झोपणाऱ्या या बेघर भिकाऱ्याची मुलाखत जेव्हा घेतली तेव्हा त्यांच्या संपत्तीचा तपशील ऐकून मुलाखत घेणाऱ्यावर थक्क होण्याची वेळ आली. लंडन मध्ये राहणाऱ्या ‘डॉम’ नावाच्या या भिकाऱ्याला त्याच्या घराच्या भाड्यापोटी दरमहा १३०० पौंड म्हणजे १.२७ लाख रुपये मिळतात. शिवाय भिक मागून तो रोज २०० ते ३०० पौड मिळवितो. डॉमला अमली पदार्थांचे व्यसन आहे आणि त्यामुळे हा सारा पैसा त्याला आपले व्यसन भागविण्यासाठी लागतो.

डॉम हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. शाळेत अॅथलेट म्हणून चमकलेला आणि शिष्यवृत्ती मिळविणारा. पण वयाच्या १३ व्या वर्षीच त्याला अमली पदार्थांचे व्यसन लागले आणि वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत तो हेरोईनच्या पूर्ण आहारी गेला. दारू, ड्रग हेच त्याचे जीवन बनले. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याच्यासाठी त्याच्या वडिलांनी घर खरेदी केले. त्या घराची किंमत ५,३०,००० पौंड म्हंजे पाच कोटींपेक्षा जास्त आहे. हे घर त्याने भाड्यावर दिले आहे कारण तो पैसा त्याला अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी लागतो. घर गेले तर पुढे काय याची त्याला चिंता वाटते. मित्र परिवाराने त्याच्याशी संबंध तोडले आहेत. त्यामुळे तो स्टेशनवर झोपतो, भिक मागतो. सोशल मिडीयावर त्याच्या या कथेची जोरदार चर्चा होते आहे.