आयसीसचा म्होरक्या अबू हाशमी ठार

दहशतवादी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीयाचा म्होरक्या अबू अबल हसन अल हाशमी अल कुरेशी लढाईत ठार झाल्याचा संदेश टेलिग्राफ चॅनलवर आयसीसच्या प्रवक्त्याने पोस्ट केला आहे. या ऑडीओ मध्ये हाशमी लढाईत ठार झाल्याचे व त्यांच्या जागी अबू अल हुसेन अल हुसैनी अल कुरेशी याची नवा नेता म्हणून निवड झाल्याचे म्हटले गेले आहे. या नव्या नेत्याविषयी कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.

आयसीसने माजी नेता अबु इब्राहिम अल हाश्मी अल कुरेशीच्या मृत्युनंतर मार्च मध्ये अल कुरेशीला नवा नेता म्हणून घोषित केले होते. म्हणजे नऊ महिन्यांपूर्वीच तो नेता बनला होता. तो माजी आयसीस खलिफा अबू बक्र अल बगदादीचा भाऊ होता. इस्लामिक स्टेटने कडव्या इस्लाम प्रणालीने हजारो लोकांना ठार केले असून क्रूर शासक अशीच त्यांची प्रसिद्धी आहे. इराक आणि आंतरराष्ट्रीय दलांनी २०१७ मध्ये आयसीसला मोसुल येथे पराभूत केल्यावर त्यातील बरेचसे दहशतवादी लपून राहिले आहेत. उत्तर सिरीया वर अमेरिकेने घातलेल्या छाप्यात कुरेशी व बगदादी यांनी स्वतःला परिवारासह बॉम्बने उडवून घेतले होते.

२०१४ पासून इराक आणि सीरियाच्या मोठ्या भूप्रदेशावर आयसीसचा कब्जा आहे.