अशी असते प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याच्या निवडीची प्रक्रिया

यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देह फतेह अल सीसी यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार केला असल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन वर्षात करोना मुळे विदेश प्रमुख पाहुणे प्रजासत्ताक दिनाला निमंत्रित केले गेले नव्हते. पण विदेशी पाहुण्यांना या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची प्रथा फार जुनी आहे. त्यांना या वेळी विशेष सन्मान दिला जातो, सत्कार केला जातो आणि गार्ड ऑफ ऑनर दिला जातो.  विदेशी पाहुण्यांची निवड करण्याची एक विशेष प्रक्रिया आहे.

ही निवड प्रक्रिया समारंभाच्या ६ महिने अगोदर सुरु होते. कुणाला आमंत्रणे पाठवायची याची यादी तयार करण्यापासून त्याची सुरवात होते. प्रमुख पाहुणे म्हणून एका वेळी अनेक नेत्यांचा विचार केला जातो. कारण एखाद्या नेत्याला त्या दिवशी अन्य कार्यक्रम असू शकतात. त्यामुळे अगोदरच वेळ विचारून निमंत्रण दिले जाते. त्यांचा होकार आल्यावर त्यांच्या निवास, पाहुणचार, बरोबरच्या लोकांची व्यवस्था, सुरक्षा अश्या अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. पाहुण्याची निवड करताना दोन्ही देशातील संबंध विचारात घेतले जातात. राजकीय, व्यापारी, सैन्य सहकार्य या बाबत दोन्ही देशांचे संबंध कसे आहेत याचाही विचार केला जातो. संबंधित देश भारताचा मित्र देश आहे हे पाहिले जाते किंवा दोस्तीचा हात पुढे करता येईल अश्या देशाचा विचार होतो.

पाहुण्याची निवड करून परराष्ट्र मंत्रालयाला पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडून मान्यता घ्यावी लागते. ती घेतल्यावर पुढची प्रक्रिया सुरु केली जाते. प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे हे नेहमीच कार्यक्रमाचे आकर्षण असतात.