धारावीच्या पुनर्विकास योजनेसाठी अदानी समूहाने जिंकली बोली

मुंबईच्या जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या रीडेव्हलपमेंट साठी सरकारने मागविलेल्या निविदेत अदानी प्रॉपर्टीजची निविदा सर्वाधिक किमतीची ठरली असून अदानी समूहाने यासाठी ५०६९ कोटींची बोली लावली होती. यात दुसर्या नंबरवर डीएलएफ ग्रुप असून त्यांनी २०२५ कोटींची निविदा भरली होती. सरकारने मागविलेल्या निविदामध्ये जगातील आठ कंपन्यांनी रुची दाखविली होती पण प्रत्यक्षात तीनच कंपन्यांनी निविदा भरल्या असे समजते. गेली २० वर्षे धारावीचे रीडेव्हलपमेंट अडकले होते.

धारावी मुंबईतील प्रसिद्ध बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जवळ मोक्याच्या जागी असून त्याचा एरिया सुमारे २.८ किमीचा आहे. येथे कातडे आणि मातीच्या वस्तू बनतात आणि देश विदेशात त्यांना मागणी आहे. सरकारी जमिनीवर वसलेल्या या झोपडपट्टीत १ लाख रोजगार आहेत. येथे ६० हजार कुटुंबे आणि १२ हजार व्यवसायिक संकुले आहेत. या भागाची  वस्ती १० लाख आहे. गेल्या १५ वर्षात चार वेळा याच्या पुनर्विकासाचे प्रयत्न झाले होते. नवा प्रोजेक्ट २० हजार कोटींचा असून पुढच्या १७ वर्षात तो पूर्ण केला जाणार आहे.येत्या ७ वर्षात पुनर्वसनाचे काम केले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २००० पूर्वीपासून जे येथे राहत आहेत त्यांना मोफत पक्की घरे दिली जाणार आहेत मात्र त्यानंतर २००० ते २०११ या काळात जे येथे आले त्यांना जागेसाठी पैसे भरावे लागणार आहेत.२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्लम डॉग मिलेनियर चित्रपटामुळे ही झोपडपट्टी जगात प्रसिध्द झाली होती. १८८२ मध्ये इंग्रजांनी मजुरांना परवडणारे घर मिळावे म्हणून ही वसाहत वसविली होती पण त्यानंतर तिथे इतकी गर्दी झाली की त्याची अतिविशाल झोपडपट्टी बनली. १९९९ मध्ये युती सरकार असताना या झोपडपट्टी विकासाचा प्रस्ताव मांडला गेला होता. आता पुन्हा शिंदे सरकारने नव्याने निविदा मागवून ही योजना पुढे नेली आहे.