पॅलेस्टाईनच्या प्रगतीसाठी भारताचा पाठींबा: मोदी


नवी दिल्ली: भारत आणि पॅलेस्टाईन या देशांमध्ये पन्नासहून अधिक वर्षांचे मैत्रीचे संबंध आहेत. पॅलेस्टाईनच्या सामाजिक, आर्थिक विकासाच्या प्रयत्नांना भारताने सक्रिय पाठिंबा दिला आहे आणि यापुढेही तो दिला जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

पॅलेस्टाईनच्या नागरिकांसाठी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी पॅलेस्टाईनच्या नागरिकांना विशेष संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

भारत आणि पॅलेस्टाईन य देशांमध्ये मैत्रीचे ऐतिहासिक संबंध आहेत. सन १९७४ मध्ये पॅलेस्टाईन लिबरेशन फ्रंटला मान्यता देणारा भारत हा पहिला गैर अरब देश होता. पॅलेस्टाईनच्या विकासासाठी भारताने नेहेमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे, असे मोदी यांनी संदेशात नमूद केले आहे.

भारताने य वर्षी ऑक्टोबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांना २५ लाख अमेरिकन डॉलर्स प्रदान केले आहेत. संयुक्त राष्ट्र त्याचा विनियोग पॅलेस्टाईनच्या निर्वासितांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी करणार आहे.

इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यामधील वाद संवादाने संपुष्टात येतील आणि दोन्ही देशांच्या सहमतीने त्यातून मार्ग निघेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला आहे.