अमेरिकन सैनिकांना योग, सूर्यनमस्कार याची रुची


डेहराडून: भारत आणि अमेरिकन सैन्याच्या युद्धासरावाच्या काळात अमेरिकन सैनिकांमध्ये योगाभ्यास, विशेषत: सूर्यनमस्कार या योग प्रकारामध्ये विशेष रुची निर्माण झाली आहे. शंभराहून अधिक अमेरिकन सैनिक योग आणि सूर्यनमस्कार याचे प्रशिक्षण घेत आहेत.

उत्तराखंड येथील ओली या ठिकाणी भारतीय आणि अमेरिकन सैन्याचा संयुक्त युद्धसराव सुरू आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ९ हजार ५०० फूट उंचावर आहे. ते भारत आणि चीन यांच्यामधील प्रत्यक्ष नियंत्रण रेखेच्या १०० किलोमीटर अंतरावर आहे.

युद्धसरावात सहभागी सैनिकांच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने होते. अमेरिकन सैनिकांनी भारतीय सैनिक सूर्यनमस्कार घालत असलेले आणि योगासने करत असलेले पाहिले. अमेरिकन सैनिकांमध्ये या व्यायाम प्रकाराबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी योग आणि सूर्यनमस्कार शिकण्यात रुची दाखवली. भारतीय सैन्याकडून अमेरिकन सैनिकांना सूर्यनमस्कार आणि योग शिकवण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुरुवातीला या प्रशिक्षणासाठी केवळ १० अमेरिकन सैनिक आले होते. आता ही संख्या १०० हून अधिक झाली आहे.

अमेरिकन सैनिक प्रामुख्याने व्यायामशाळेत यंत्राच्या साहाय्याने अथवा वजन उचलण्याचे व्यायाम करतात. त्यामुळे स्नायू बळकट बनतात. मात्र ते कठीण बनतात. त्यामध्ये लवचिकता राहत नाही. सूर्यनमस्कार आणि योगासनांमुळे स्नायू लवचिक होत असल्याचे अमेरिकन सैनिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रस्तरारोहण व अन्य आव्हानात्मक शारीरिक क्रिया सुलभ होतात. फायरिंग करताना एकाग्रता लवकर साधली जाते, हे अमेरिकन सैनिकांना जाणवले आहे.

योगाच्या प्रशिक्षणाबद्दल अमेरिकन सैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. सकाळचा प्रशिक्षणाचा ठराविक कालावधी संपल्यावरही फावल्या वेळेत ते भारतीय सैनिकांकडून योगाचे धडे गिरवत आहेत.

भारत आणि अमेरिकन सैन्याचा संयुक्त युद्धसराव सन २००४ पासून दरवर्षी आयोजित केला जातो. या वर्षीचा १८ वा युद्धसराव असून उंचावर पर्वतराजीमध्ये आयोजित केलेला हा पहिला युद्धसराव आहे. या सरावात विविध प्रकारच्या भगोलिक परिस्थिती आणि हवामानाशी जुळवून घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत व बचावकार्य करणे, दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेली ठिकाणे अथवा अपहरण केलेली माणसे मुक्त करणे, गोळीबार इत्यादीचे प्रशिक्षण व सराव करून घेतला जात आहे.