सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला

जगातला सर्वात मोठा आणि जिवंत ज्वालामुखी हवाई मधील मौना लोवा रविवारी रात्रीपासून सतत भडकत असून त्यातून आकाशात उंच ज्वाला फेकल्या जात आहेत. रविवारी रात्री साडे अकरा पासून हा ज्वालामुखी भडकला असून त्यातून मोठ्या प्रमाणावर लावा बाहेर पडत आहे. रात्रीचे आकाश लाल दिसते आहे. युनायटेड स्टेट जिओलॉजिकल संस्थेकडून दिल्या जात असलेल्या माहितीनुसार लावा, राख आणि वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असली तरी स्थानिक लोकांना अद्यापि धोका नाही. वाऱ्यामुळे राख आणि गॅस अन्यत्र वाहून नेले जाऊ शकतील. पण लावा वाहण्याचा वेग आणि स्फोट वाढले तर ज्वालामुखीच्या तोंडातून लावा डोंगर उतरुन वाहू लागण्याची शक्यता आहे आणि अश्या वेळी नागरिकांना अन्यत्र हलवावे लागेल.

हवाईच्या आपत्कालीन नियंत्रण संस्था आणि पर्यटन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार ४० वर्षानंतर हा ज्वालामुखी प्रथमच फुटला आहे. हवाई मधील स्थानिकांनी त्यांचे फोटो शेअर केले आहेत. हा ज्वालामुखी समुद्रसपाटीपासून १३६०० फुट उंचीवर आहे. डोंगरावरून आगीची नदी वाहताना दिसते आहे. १९८४ मध्ये या ज्वालामुखीचा पहिला उद्रेक झाला होता. जगातील दुसरा मोठा ज्वालामुखी सुद्धा हवाई बेटांवरच आहे तर तिसरा मोठा ज्वालामुखी स्पेन मध्ये आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडणारे वायू जीवघेणे असून शकतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर धूळ, राख उडत राहिली तर येथील स्थानिकांना अन्यत्र हलविले जाईल असे समजते.