रोनाल्डोला या क्लबकडून बम्पर ऑफर

दिग्गज फुटबॉलपटू, पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर आणि फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये चाहत्यांचा आकर्षण केंद्र असलेल्या रोनाल्डोला स्पर्धा सुरु असतानाच एका क्लब कडून नवीन कराराची ऑफर आली आहे. स्पर्धा सुरु असतानाचा रोनाल्डोला एक धक्का बसला होता तो म्हणजे ब्रिटनच्या मँचेस्टर युनायटेड क्लबने रोनाल्डोचा क्लब बरोबरचा करार मुदत संपण्यापूर्वी रद्द केला होता. पण आता सौदीच्या एका मोठ्या क्लबने, अल नासरने रोनाल्डोला तीन वर्षाच्या करारासाठी चक्क १८३७ कोटींची ऑफर देऊन दुसरा आनंदाचा धक्का दिला आहे.

अल नासरने रोनाल्डोला सिझनच्या सुरवातीलाच ही ऑफर दिली असून फिफा वर्ल्ड कप संपेपर्यंत ती कायम राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोनाल्डोने एका मुलाखतीत इंग्लिश मँचेस्टर युनायटेड क्लब विरोधात काही वक्तव्ये केली होती. त्यामुळे या क्लबने या महिन्यातच रोनाल्डो बरोबरचा करार रद्द केला होता. एक वर्षापूर्वीच रोनाल्डोने इटालियन युवेंटस क्लब सोडून मँचेस्टर युनायटेड बरोबर करार केला होता. मात्र प्रथम पासूनचा रोनाल्डो आणि क्लब व्यवस्थापनात मतभेद होत असल्याचे समोर आले होते.

रोनाल्डोने सौदी क्लब अल नासरला अजून होकार दिलेला नाही. कारण त्याने ही ऑफर घेतली तर त्याचे युरोपीय फुटबॉल करियर संपेल असे सांगितले जात आहे. अल नासर सौदी मधील सर्वात यशस्वी आणि सन्मानित टीम मानली जाते. रोनाल्डोने संमती दिली तर काही दिवसात हे डील फायनल करण्याची क्लबची तयारी आहे असे समजते.