मंकी पॉक्सचे जागतिक आरोग्य संघटनेने बदलले नाव

करोना पाठोपाठ मंकी पॉक्सच्या साथीने जगात कहर माजविला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी मंकी पॉक्स हे नाव बदलून त्याऐवजी या रोगाला एमपॉक्स असे नवे नाव दिले आहे. जेव्हा मंकी पॉक्सचा जगभर फैलाव होऊ लागला तेव्हा वंशवादी, भेदभाव आणि असभ्य भाषेचा वापर त्यासाठी केला जाऊ लागला म्हणून अनेक देशांनी या रोगाचे नाव बदलावे असा सल्ला दिला होता. त्यानुसार नवे नाव दिले गेले असून आणखी एक वर्षभर जुने आणि नवे अशी दोन्ही नावे वापरात राहतील असा खुलासा केला गेला आहे.

मंकी पॉक्स हे नाव का दिले गेले यामागचे कारण असे कि डेन्मार्क मध्ये संधोधकाना माकडामध्ये हे विषाणू सर्वप्रथम सापडले होते. ब्रिटन मध्ये जेव्हा या रोगाचा प्रसार झाला तेव्हा माकडांना विष देऊन ठार केल्याचे अनेक प्रकार तेथे समोर आले. हा रोग जनावरातून माणसांना होतो. पण त्यासाठी फक्त माकडांना जबाबदार धरता येणार नाही असे अनेक संशोधकांचे म्हणणे पडले. त्यानुसार मग जागतिक आरोग्य संघटनेने एका विशेष वेबसाईटवर या रोगासाठी नवे नाव सुचवावे असे आवाहन जनतेला केले होते.

मे महिन्यात मंकी पॉक्सची पहिली केस आली होती आता जगभरात भारतासह अनेक देशात त्याचा फैलाव झाला आहे. पूर्वी या रोगामुळे मृत्यू ओढवत नाही असे म्हटले जात होते पण आता संक्रमित रुग्णांचे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. या विषाणूची लागण ८० हजार लोकांना झाली असून त्यातील ५५ जण मृत्युमुखी पडले आहेत.