फिफा स्पर्धा २०२२ वर जीवघेण्या कॅमल फ्लूचे सावट

कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ वर कॅमल फ्लू साथीचे सावट आले असून जागतिक आरोग्य संघटनेने येथे जमलेल्या सुमारे १२ लाख प्रेक्षक, खेळाडूना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. करोनाचे जागतिक संकट अजून पूर्ण दूर झालेले नाही. त्याच वेळी करोनाचा भाऊ म्हणता येईल अश्या कॅमल फ्लूचा धोका वाढला आहे. कॅमल फ्लू हा सुद्धा श्वसन बाधित करणारा आजार आहे. डेली मेलच्या रिपोर्ट नुसार नोव्हेंबर २०२२ रोजी सुरु झालेला फिफा वर्ल्ड कप २० डिसेंबर रोजी संपणार आहे. या काळात लाखो प्रेक्षक स्टेडीयम मध्ये गोळा होत आहेत. कॅमल फ्लू हा मंकी पॉक्स पेक्षा घातक विषाणू मानला जातो.

कतार सरकारने कॅमल फ्लूचा फैलाव होऊ नये आणि झाला तरी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केली आहे तरीही सतत सावधानता बाळगणे फार आवश्यक आहे. कारण या रोगाची लक्षणे अगदी सौम्य असतात आणि अनेकदा लक्षणे दिसतही नाहीत. यात सौम्य ताप, श्वसनास त्रास अशी लक्षणे दिसतात आणि प्रामुख्याने उंटाच्या मार्फत या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांनी उंटाना हात लावू नये अश्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच खाद्यपदार्थ आणि पेये घेताना केलेले नियम कटाक्षाने पाळले जावेत असे बजावले गेले आहे.

२०१२ मध्ये सौदी मध्ये प्रथम या विषाणूचे रोगी सापडले होते. कतार सौदीचा शेजारी देश आहे. गेल्या १० वर्षात या विषाणूच्या २६०० केसेस आढळल्या आहेत आणि ९३५ मृत्यू झाले आहेत. २७ विविध देशात या विषाणूचा फैलाव झाला आहे. याची लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे त्याचा प्रसार रोखणे अवघड होते. भविष्यात हा विषाणू महामारी बनून येऊ शकतो असेही सांगितले जात असून त्यावेळी दर तीन रुग्नात एक मृत्यू असे त्याचे प्रमाण असू शकते असा इशारा दिला गेला आहे.