आफताब तिहार मध्ये कैदी नंबर ११५२९

श्रद्धा वालकर हत्या प्रकारातील आरोपी आफताब पूनावाला याला तिहार तुरुंगात चार नंबरच्या जेल मध्ये ठेवण्यात आले असून त्याची ओळख आता कैदी नंबर ११५२९ अशी आहे. त्याचवर सतत नजर ठेवली गेल्याचे समजते. त्याच्यावर सुसाईड वॉच ठेवला गेला असून तुरुंग स्टाफला सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार स्वतःला इजा करून घेऊ शकेल अशी कोणतीही वस्तू आफताबला मिळणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

१५ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आफताबला तिहार येथे कैदेत ठेवले गेले असून चार नंबरचा तुरुंग, प्रथमच तुरुंगात येणार्या कैद्यांसाठी आहे.आफताब सोबत त्याच्या कोठडीत आणखी दोन कैदी आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा आफताबवर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली गेल्याचे समजते. आफताब याच्या पोलीस कोठडीतील वर्तणुकीमुळे तपास अधिकारी हैराण झाले आहेत. रविवारी सकाळी आफताब याने नाश्ता केला. सोबतच्या कैद्यांना तुरुंगाची माहिती विचारली. कोणत्या सुविधा आहेत याची माहिती घेतली, खाणे पिणे असे आहे असेही विचारले.

आफताब याला बाहेर फिरण्याची परवानगी दिली गेलेली नाही. सोमवारी त्याची अपूर्ण राहिलेली पॉलीग्राफी टेस्ट पुढे सुरु केली जाणार असून त्यानंतर त्याची नार्को टेस्ट केली जाणार आहे. डॉक्टर तपासणीत आफताब पूर्ण फिट ठरला आहे. जेल मध्ये भेटायला यावे असे वाटत असलेल्या व्यक्तीची नावे देताना आफताबने आई वडील, भाऊ आणि एका मित्राचे नाव अर्जात दिले असून बाकी कुणाला भेटायचे नाही असे सांगितले आहे.