चीनमध्ये शी जिनपिंग यांना हटवण्याची मागणी

बीजिंग: चीनमध्ये सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाने सर्वसामान्य नागरिकांना पोलादी भिंतीआड जखडून त्यांचा आवाज दडपून टाकल्याची परिस्थिती आहे. तरीही आता सत्ताधारी साम्यवाद्यांना न जुमानता सामान्य नागरीक स्वातंत्र्याची मागणी करण्याचे बळ एकवटू लागले आहेत.

चीनमधील काही शहरांमध्ये सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्वयंस्फूर्त निदर्शने केली. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची हकालपट्टी करा. कम्युनिस्ट पक्षाला हटवा. आम्हाला स्वातंत्र्य द्या, अशा अर्थाच्या घोषणा निदर्शकांनी दिल्या आहेत.

चीनमध्ये सत्तेवर कम्युनिस्ट पक्षाची एकहाती आणि पोलादी पकड आहे. ही एकप्रकारे जनतेवर लादलेली हुकुमशाही असली आणि त्याच्या विरोधात नागरिकांमध्ये आपसात कुजबूज होत असली तरी जाहीरपणे कम्युनिस्ट पक्ष आणि अध्यक्ष जिनपिंग यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस कोणी करत नाही. मात्र, एका इमारतीला आगीने विळख्यात घेतल्याचे तात्कालिक निमित्त घडल्याने सामान्य नागरिकांच्या मनातील धगधगत्या असंतोषाचा भडका उडू लागला आहे.

शिंजियांग प्रांताची राजधानी असलेल्या उरुमकी शहरात नुकतेच एका बहुमजली उंच इमारतीला भीषण आगीने आपल्या विळख्यात घेतले. चीनमध्ये कोरोनाच्या साथीने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे ही इमारत अंशत: बंद होती. त्यामुळेच आगीवर वेळीच नियंत्रण आणण्यास मर्यादा आल्याची नागरिकांची भावना आहे.

या तात्कालिक कारणामुळे जनतेच्या मनातील असंतोष उफाळून आला आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्त असूनही कोरोना प्रतिबंध उठवा. उरुमुकी निर्बंधमुक्त करा. शिंजीयांग प्रांतातील निर्बंध उठवा, अशा मागण्या करण्याबरोबरच नागरीक थेट स्वातंत्र्याची, जिनपिंग यांना हटवण्याची मागणी करू लागले आहेत.