विना परवानगी नाही वापरता येणार बिगबीं चा आवाज, फोटो, नाव

बॉलीवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांचा आवाज, नाव, फोटो किंवा अन्य व्यक्तिगत बौद्धिक संपदा वापरण्यास परवानगी घ्यावी लागेल असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या संदर्भात बच्चन यांनी याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयाने हंगामी आदेश दिला आहे. दूरसंचार मंत्रालय, संबंधित विभाग, देशातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर यांना या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. बिगबी यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या बौद्धिक संपदा अधिकाराचा वापर हे त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन मानले जाणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी नकली कौन बनेगा करोडपती लॉटरी मध्ये त्यांचा फोटो, आवाजाचा वापर प्रचारासाठी केला जात असून त्यांच्या अधिकाराच्या सुरक्षेची मागणी याचिकेतून केली होती. बिग बी यांच्या तर्फे प्रसिद्ध कायदेतज्ञ हरीश साळवे यांनी न्यायाधीश नवीन चावला यांच्या समोर केस मांडली. बच्चन हे प्रसिद्ध व्यक्ती आहेत. विविध जाहिरातीत त्यांचा आवाज वापरायचा असेल तर त्यांची परवानगी घेतली गेली पाहिजे. अनेकदा या प्रकारातून त्यांची बदनामी होते. केबीसी लॉटरी नोंदणी करण्यासाठी केल्या जात असलेल्या जाहिरातीत बिग बी यांचा फोटो, आवाज वापरला जात आहे. मुळात ही लॉटरी हाच घोटाळा आहे. यात पैसे गोळा केले जातात पण लॉटरी कुणीच जिंकत नाही. टी शर्टवर सुद्धा अमिताभ यांचे फोटो छापले गेले आहेत, वेबसाईट डोमेन अमिताभ बच्चन यांच्या नावाने नोंदले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत बौद्धिक संपदेच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे साळवी यांनी न्यायालयापुढे प्रतिपादन केले आहे.

साळवी यांच्या युक्तीवादावर निकाल देताना न्यायालयाने वरील आदेश दिला असून याची पुढील सुनावणी मार्च मध्ये होणार आहे. तो पर्यंत विना परवानगी अमिताभ बच्चन यांचा आवाज, फोटो, नाव कुणाला वापरता येणार नाही.