म्हणून फॉर्म्युला वन कार्स मध्ये नसतात एअर बॅग्ज

भारतात आता कार्स मध्ये एअर बॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. अगदी ५ ते ६ लाख रुपयांच्या कार्स मध्ये सुद्धा एअर बॅग्ज असणे बंधनकारक आहे. कार वेगात असताना जर अपघात झाला तर एअर बॅग्जमुळे आतील प्रवाशांचे जीव वाचू शकतो. देशात हायवे आणि एक्स्प्रेस वे चे जाळे वेगाने विकासीत होत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्स सुद्धा ताशी १०० च्या वेगाने जातात. युवा वर्गाला वेगाची क्रेझ असते आणि हायवे रिकामा मिळाला कि कार्सचा वेग ताशी १४० ते २०० पर्यंत सुद्धा नेला जातो. अश्या वेळी अपघात झाला तर सीट बेल्ट लावले असले तर एअर बॅग्जमुळे जीव वाचण्याची शक्यता वाढते.

रेसिंग कार्स किंवा फॉर्म्युला वन कार्स मध्ये मात्र एअर बॅग्ज नसतात. या कार्सच्या किमती १०० कोटींपासून सुरु होतात आणि त्यांचा वेग ताशी ३०० ते ४०० किमी सुद्धा असतो. तरीही या कार्स मध्ये एअर बॅग्ज का नसतात असा प्रश्न कुणालाही पडेल. या कार्सचा स्पीड इतका असतो कि ड्रायव्हर बाहेरचे अन्य कोणतेच आवाज ऐकू शकत नाहीत. पण या कार्स चालविणारे चालक जवळजवळ आडवे झोपल्याच्या पोझिशन मध्ये कार्स चालवितात. त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असते आणि खांद्यांवर सुरक्षेसाठी बेल्ट असतो.

सामान्य कार्स मध्ये सीट बेल्ट दोन किंव ३ पॉइंटचे असतात. पण रेसिंग कार मध्ये ते ६ पॉइंटचे असतात. यामुळे चालक सीटला पूर्ण चिकटून राहतो. अपघात झाला तरी कारचे स्टेअरिंग किंवा बॉनेट चालकाच्या छातीवर धडकत नाही. सहा पॉइंट सीट बेल्ट म्हणजे प्रवासी सहा ठिकाणी कारला बांधला गेलेला असतो. यामुळे चालक अपघातात मृत्युमुखी पडण्याची शक्यता बरीच कमी होते.