स्मार्टफोन वेड्यांसाठी अनोखी सिस्टीम, ट्राफिक लाईट पायाखाली

वाहतूक नियंत्रण दिवे सर्वच देशात पाहायला मिळतात. हिरवा दिवा ‘जा’ सांगतो तर लाल दिवा सांगतो थांबा. पिवळा दिवा वेग कमी करा सुचवितो.  अतिगर्दीच्या शहरांत चौकाचौकामध्ये असे ट्राफिक लाईट बसविले जातात जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील आणि पादचाऱ्यांची सुरक्षा सांभाळली जाईल. पण जग वेगाने बदलते आहे, जुन्या गोष्टी, पद्धती जाऊन त्यांची जागा नव्या गोष्टी घेतात. स्मार्टफोन हा आजकाल सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू बनला आहे आणि स्मार्टफोन वरून नजर बाजूला करणे अनेकांना अवघड झाले आहे. मग रस्ता असो, घर असो वा अन्य कुठले स्थळ असो, फोनवर नजर ठेउनच सर्व कामे केली जातात आणि त्यात रस्ता क्रॉस करणेही आलेच.

तर गर्दीचे रस्ते क्रॉस करताना स्मार्टफोन वेड्यांच्या संरक्षणाची काळजी घेणे भाग आहे हे लक्षात घेऊन द.कोरिया सरकारने राजधानी सेओल मध्ये  नवा प्रयोग २०१९ पासून राबविला आहे. यात पादचार्यांसाठी ट्राफिक लाईट रस्त्यावर त्याच्या पायाखाली येतील असे लावले गेले आहेत. यामुळे स्मार्टफोन पाहत असतानाही पादचारी हिरवा सिग्नल आहे कि लाल हे पाहू शकतात आणि त्यानुसार रस्ते क्रॉस करतात. इंडिपेंडंट च्या बातमीनुसार कोरिया मध्ये पादचारी दुर्घटना वाढल्या आणि त्यातही स्मार्टफोन पादचारी अधिक संख्यने असल्याचे दिसले तेव्हा २५ जिल्यात असे रस्त्यावर जमिनीवर ट्राफिक लाईट बसविले गेले. त्याचा चांगला उपयोग होताना दिसला आहे. याशिवाय येथे अॅलर्ट सिस्टीम लागू केली असून मोबाईलवर रोड क्रॉसचा मेसेज सुद्धा दिला जातो.