भारतीय सेनेसाठी नवे जिवंत अँटी ड्रोन मदतगार, घारी आणि कुत्री

भारतीय लष्कराला सीमा भागात नवी अँटी ड्रोन सिस्टीम लवकरच उपलब्ध होत असून ही सिस्टीम म्हणजे जिवंत मदतगार आहेत. मेरठ येथील वेटर्नरी कोर ने अनेक घारीना प्रशिक्षण दिले असून प्रशिक्षित श्वान पथकासह या घारी शत्रूची ड्रोन पाडणे आणि नष्ट करण्यास मदत करणार आहेत. सर्वच देशांना ड्रोन आता उपद्रवी ठरू लागली आहेत. विशेषतः शत्रूची ड्रोन. कमी उंचीवरून उडणारी असल्याने रडारच्या पकडीत न येणारी, स्फोटके, शस्त्रे, अमली पदार्थ वाहून नेऊ शकणारी आणि शत्रू प्रदेशात हेरगिरी करू शकणारी, छोटे मोठे हल्ले करू शकणारी ड्रोन सर्वच देशांना सुरक्षेच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत आणि यामुळे अँटी ड्रोन सिस्टीम कार्यान्वित करण्यावर सर्व देश भर देत आहेत.

उत्तराखंडच्या औली मध्ये सध्या भारतीय सेना आणि अमेरिकी सेना यांचा संयुक्त सराव सुरु आहे. त्यात या घारी आणि श्वान अँटी ड्रोन सिस्टीम म्हणून कसे काम करतात याची प्रात्याक्षिके दाखविली जाणार आहेत. दीर्घकाळ या घारींना प्रशिक्षण दिले गेले असून आत्ता त्या मिशन साठी तयार आहेत. घारींचे वैशिष्ट म्हणजे त्यांचे मजबूत पंख आणि पंजे, तसेच तीक्ष्ण नजर. शत्रूवर झडप घालून त्याला एकदा पंज्यात पकडले कि त्याची सुटका होणे अवघड. यामुळे अँटी ड्रोन सिस्टीमसाठी घारी नैसर्गिक रित्याच फिट असल्याचे म्हटले जाते.

भारतीय सेनेची प्रशिक्षित श्वान आणि घारी शत्रूच्या ड्रोनचा तपास करून ती नष्ट करणार आहेत. कुत्र्यांना हवेतून येणाऱ्या आणि माणसांना सहज ऐकू न येणाऱ्या ध्वनी लहरी ऐकू येतात. त्यांच्या या क्षमतेचा वापर करून घेतला जात आहे. शत्रूच्या ड्रोनचा आवाज एकू येताच हे कुत्रे त्यांच्या हँडलरला सावध करते आणि त्यादिशेने प्रशिक्षित केलेल्या घारी सोडल्या जातात. घारीचे डोळे अतिशय तेज असल्याने त्या चटकन ड्रोन पाहू शकतात आणि मजबूत पंखांनी ड्रोन पाडू शकतात या प्रकारे शत्रूची ड्रोन कोणत्याही हल्ल्यापूर्वी नष्ट केली जातात असे समजते.