भारत जोडो मध्ये राहुलला मिळाली प्रियांका, रोबर्ट यांची साथ

गेले ७८ दिवस सुरु असलेल्या कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अखेरी बहिण प्रियांका, मेव्हणे रोबर्ट वडरा आणि भाचा रेहान यांची साथ मिळाली आहे. ही यात्रा सध्या मध्यप्रदेशात सुरु असून खांडवा येथे प्रियांका, रोबर्ट आणि रेहान राहुल सोबत पदयात्रेत सामील झाले आहेत. मध्यप्रदेशात भाजप सरकार असून येथे ही यात्रा १० दिवस चालणार आहे. बोरगोन येथून ही यात्रा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या जळगाव मधून या यात्रेने मध्यप्रदेशात प्रवेश केला आहे.

एकूण ३५७० किमीच्या या यात्रेतील ३९९ किमी अंतर मध्यप्रदेशात पार केले जाणार आहे. सात जिल्ह्यातून ही यात्रा प्रवास करणार आहे. या ठिकाणी कॉंग्रेस कमजोर आहे. बुऱ्हानपूर, खांडवा, खरगोन, इंदोर, उज्जैन, आगरमालवा असे हे जिल्हे असून येथे विधानसभेचे २५ ते ३० मतदारसंघ आहेत. या भागात पाच लोकसभा मतदार संघ येतात आणि सर्व पाची ठिकाणी भाजपचे खासदार निवडून आलेले आहेत.

कॉंग्रेसचे राजस्थान मधील नेते सचिन पायलट हेही गुरुवारी या यात्रेत सहभागी झाले आहेत. बोरगान येथे झालेल्या रॅली मध्ये राहुल गांधी यांचे भाषण झाले असून राहुल यांच्या स्वागताची खास व्यवस्था केली गेली होती.