चीन मध्ये पुन्हा करोनाचे थैमान, एका दिवसात ३१ हजार संक्रमित

चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य ब्युरोने प्रसिद्ध केलेली आकडेवारी धक्कादायक असून चीन मध्ये पुन्हा नव्याने करोना बॉम्ब फुटल्याचे समोर येत आहे. बुधवारी दैनिक केसेचा आकडा ३१४५४ वर गेला असून करोना महामारी सुरु झाल्यापासून हा सर्वाधिक आकडा असल्याचे सांगितले जात आहे. झेन्ग्झू येथील अॅपल कारखान्यात कामगार आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालेल्या हाणामारीमुळे सरकारने प्रवास बंदी घातली असून कडक लॉकडाऊन लागू केला आहे. मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि लसीकरण सुरु झाले आहे.

राजधानी बीजिंग मध्ये करोनामुळे कडक प्रतिबंध लावले गेले असून पार्कस, मॉल, कार्यालये, शॉपिंग सेन्टर्स पूर्ण बंद केली गेली आहेत. सर्वाधिक वस्ती असलेल्या चाओयंग जिल्यात पूर्ण लॉकडाऊन लागला असल्याने सुमारे ३५ लाख वस्तीचे गाव घरात बंदिस्त झाले आहे. करोना देशाच्या अन्य भागात वेगाने पसरत आहे आणि काही ठिकाणी परिस्थिती बेकाबू झाली आहे. नवीन संक्रमित संख्या वेगाने वाढत असून १ नोव्हेंबर पासून ही संख्या २,८०,००० वर गेल्याचे सांगितले जात आहे.

ब्रोकरेज फर्म नोमुराने चायना कोविड लॉकडाऊन इंडेक्सचा आधार घेऊन सादर केलेल्या रिपोर्ट नुसार चीन मध्ये कोविड संक्रमित संख्या वेगाने वाढती असून गेल्या एक आठवड्यात देशात लॉकडाऊन मुळे परिस्थिती बिघडली आहे. सरकारी आकडे आणि सर्व्हेक्षण नुसार २१ नोव्हेंबर पर्यंत ४९ शहरात कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन लागला आहे. त्यामुळे ४१.२ कोटी लोक प्रभावित झाले आहेत.