आज आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादव यांची भेट

महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवा नेते आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आज म्हणजे बुधवारी बिहार पाटणा येथे जाऊन राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि नितीश कुमार सरकारचे उपमुख्यमंत्री लालू पुत्र तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. आदित्य यांच्यासोबत शिवसेना उपनेते अनिल देसाई आणि शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह अन्य काही मंडळी आहेत. राबडी आवास, १० सर्क्युलर रोड येथे ही भेट होणार आहे असे समजते.

आदित्य ठाकरे आणि तेजस्वी हे आपपल्या पक्षांचे युवा नेते आहेत. बिहार मध्ये भाजपची साथ सोडून नितीशकुमार यांनी राजद बरोबर आघाडी करून नवे सरकार स्थापले तेव्हापासूनच भाजप विरोधात अन्य पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न तेजस्वी करत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर आदित्य ठाकरे अन्य पक्षातील युवा नेत्यांच्या भेटी घेऊन भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातूनच त्यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत हजेरी लावली होती. जाणकारांच्या मते मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. यामुळे आदित्य कदाचित तेजस्वी यांना मुंबईमध्ये आमंत्रित करून येथील बिहारी जनतेची मते त्यांच्या पक्षाला मिळवीत याची तयारी करत असावेत.

ठाकरे परिवारातील राजकीय नेता बिहारच्या लालू यादव परिवारातील अन्य राजकीय नेत्याला भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे.