अद्भुत ओम पर्वत

हिंदू संस्कृती मध्ये भगवान शिवाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर असते असे मानले जाते. अनेक भाविक, कैलासाची ही अति खडतर यात्रा करतात. पृथ्वीवर तीन कैलास आहेत असे मानले जाते. पैकी पहिला कैलास मानसरोवर. हा तिबेट मध्ये आहे. दुसरा आदि कैलास किंवा छोटा कैलास. यालाच ओम पर्वत म्हटले जाते आणि या ओम पर्वताचे खास ऐतिहासिक महत्व आहे. हा पर्वत भारत, नेपाल आणि तिबेट यांच्या सीमा जेथे मिळतात तेथे आहे. हा उत्तरांचलचा भाग आहे. तिसरा कैलास म्हणजे हिमाचल मधील किन्नोर कैलास.

भगवान शिव महान तपस्वी मानले जातात. शिवाचे असंख्य भाविक आहेत. आदि कैलास किंवा ओम पर्वताचे विशेष म्हणजे येथे डोंगर माथ्यावर नैसर्गिक स्वरुपात बर्फापासून ओमची आकृती बनते. अनेक भाविक या पर्वताची यात्रा करतात. या पर्वतासंबंधी अनेक कहाण्या सांगितल्या जातात. पण माथ्यावर बनणारी ओमची आकृती हा ईश्वरी चमत्कार मानला जातो. असे सांगतात कि हिमालय पर्वत रांगात विविध आठ शिखरावर अशी ‘ओम’ ची आकृती बनते पण सद्यस्थितीत तरी फक्त ओम पर्वताचीच माहिती सर्वाना आहे.

या पर्वताची समुद्रसपाटी पासूनची उंची ६१९१ मीटर म्हणजे २०,३१२ फुट आहे. असे म्हणतात येथे बर्फ पडत असतो तेव्हा ‘ओम’ चा नैसर्गिक ध्वनी येतो. सूर्याची पहिली किरणे या पर्वतावर पडतात, तेव्हा ही आकृती चमकून उडते. प्राचीन काळापासून हा पर्वत अस्तित्वात आहे मात्र १९८१ पासून तो जनमानसात अधिक चर्चेत आला. हिमालय पर्वतरांगेत अनेक लहान मोठी पर्वत शिखरे आहेत आणि त्यावर देवी देवतांचा निवास असतो अशी लोकांची भावना आहे.