जगाला प्रथमच झाले किम जोंग उनच्या कन्येचे दर्शन

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्या कन्येचे प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले असून किम जोंग उनने पत्नी आणि मुलीला मिसाईल टेस्ट दाखविण्यासाठी आणले होते. किम जोंगच्या पत्नीचे नाव री सोल जू असे असून मुलीचे नाव जू एई असे असल्याचे सांगितले जाते. किम जोंग उन यांच्या परिवारात नक्की किती सदस्य आहेत यांची कुणालाच कल्पना नाही. त्याची पत्नी सुद्धा फार क्वचित वेळा त्यांच्यासोबत दिसते.

उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्त संस्थेकडून प्रसिद्ध केलेल्या फोटो मध्ये किम जोंग उन मुलगी जू हिचा हात धरून जाताना दिसतो आहे. जू हिने पांढरे जॅकेट घातले आहे. शुक्रवारी आंतरमहाद्वीप बॅलेस्टीक मिसाईल ‘ह्यासॉंग -१७ ( द मायटी)चे प्रक्षेपण केले गेले त्याचे फोटो सरकारी मिडीयाने प्रसिद्ध केले आहेत. त्यात किम जोंग उन पत्नी आणि मुलीसह हे प्रक्षेपण पाहत असल्याचे फोटो आहेत.

आंतरराष्ट्रीय विश्लेशकांच्या म्हणण्यानुसार किम जोंग उनने त्याच्या मुलीला जगासमोर आणण्यातून एक संदेश दिला आहे. आमची पुढची पिढी तयार आहे असा हा संदेश आहे. जू एई किम जोंग उनची दुसरी मुलगी असल्याचे सांगितले जाते. किम जोंग उन एक चांगला पिता असून तो ज्याप्रमाणे देशाचे रक्षण करण्यास प्राधान्य देतो तसेच स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्याबाबत सुद्धा दक्ष आहे असे सांगितले जाते.