ईडीचे समन्स दाखवून आता होणार नाही फसवणूक

ईडीचे समन्स आल्याचे दाखवून फसवणूक करायची आणि मोठ्या रकमा उकळण्याचे गुन्हे देशात वाढत चालले असताना या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी इडीनेच कंबर कसली आहे. त्यानुसार या विभागाकडून एक पत्रक प्रसिद्धीसाठी दिले गेले आहे. त्यात दिलेल्या माहितीप्रमाणे ‘धनशोधन निवारण अधिनियमासह विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमाखाली जारी केलेल्या समन्सवर क्यूआर कोड दिले गेले आहेत.’ ज्यांना इडीचे समन्स येते अश्या व्यक्ती हा क्यूआर कोड स्कॅन करून समन्सची सत्यता तपासून पाहू शकणार आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर थेट इडी पोर्टलवर जाता येणार असून तेथे समन्स पासकोड घातला कि समन्स विषयी सर्व विवरण मिळू शकणार आहे.

देशात ईडीचे बनावट समन्स दाखवून लुबाडण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. इडीने या प्रकरणी नुकतेच आंतरराज्यीय टोळीचे पितळ उघडे पाडले आहे. हायप्रोफाईल व्यक्ती, व्यापाऱ्यांना नकली समन्स, नोटीसा देऊन धमक्या दिल्याचे प्रकार समोर आले आहेत. निप्पोन पेंटच्या अध्यक्षांना असेच बनावट समन्स पाठविले गेले होते आणि त्यांना दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर होण्यास सांगितले गेले होते. त्या बाबत या अध्यक्षांनी ईडीला माहिती दिली. तेव्हा ईडीनेच या टोळीशी संपर्क साधून त्यांना चर्चेसाठी दिल्लीत या असे सांगितले होते. त्यानुसार अखिलेश मिश्रा सह आलेल्या अन्य आरोपींना ईडीने सापळा रचून अटक केली.

या टोळीत मुंबईचे हरीश जोशी आणि देवेंद्र दुबे अश्या दोघांचा समावेश आहे. हे दोघे ईडी अधिकारी असल्याचे भासवून लोकांना बनावट समन्स देऊन त्याबदली पैसे उकळत होते. हे दोघे भारत सरकारचे स्टीकर लावलेल्या कार मधून फिरत असल्याचे उघडकीस आले आहे.