मस्क यांचे अनोखे रेकॉर्ड, वर्षात सर्वाधिक संपत्ती गमावणारा पहिला अब्जाधीश

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांनी एक अनोखे रेकॉर्ड केले आहे. एक वर्षात १०१ अब्ज डॉलर्स गमावणारे ते पहिले अब्जाधीश बनले आहेत. धनकुबेर यादीतील टॉप १० मधे चार व्यक्ती अश्या आहेत ज्यांची आयुष्यातील कमाई सुद्धा १०० अब्ज डॉलर्स नाही. ब्लुमबर्गच्या एका अहवालानुसार सोमवारी मस्क यांनी ८.५९ अब्ज डॉलर्स गमावले असून त्यांची एकूण संपत्ती आता १७० अब्ज डॉलर्सवर आली आहे. संपत्ती गमावण्याच्या या यादीत फेसबुकचा सह संस्थापक मार्क झुकेरबर्ग दुसऱ्या नंबरवर आहे. त्याने ८३.५ अब्ज डॉलर्स गमावले आहेत.

जगातील श्रीमंत यादीत भारतीय उद्योजक गौतम अदानी हे एकमेव असे उद्योजक आहेत ज्यांच्या संपत्ती मध्ये या वर्षात ५३ अब्ज डॉलर्सनी वाढ झाली आहे. एलोन मस्क आणि मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती कमी होण्यात मोठा वाटा शेअर्सच्या घसरलेल्या किमतीचा आहे. टेस्लाचा शेअर या वर्षात ५८ टक्के तर मेटा फेसबुकचा शेअर या वर्षात ६७ टक्क्यांनी कोसळले आहेत. त्यामुळे या दोघाच्या संपत्ती मध्ये मोठी घट दिसून आली आहे. तुलनेत अदानी यांची संपत्ती १३० अब्ज डॉलर्सवर गेली असून त्यांनी श्रीमंत यादीत अमेझोनचे जेफ बेजोस यांना मागे टाकून तीन नंबरवर उडी घेतली आहे.

या यादीत बेजोस चार नंबरवर असून त्यांची संपत्ती ११६ अब्ज डॉलर्स, बिल गेट्स ११३ अब्ज डॉलर्स, वॉरेन बफे १०९ अब्ज डॉलर्स, आणि भारतीय उद्योजक मुकेश अंबानी ८८.२ अब्ज डॉलर्स अशी ही आकडेवारी आहे. मुकेश या यादीत नऊ नंबर वर आहेत.