फिफा वर्ल्ड कप मधले हे अनोखे स्टेडीयम बनलेय कंटेनरपासून

कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये एक खास स्टेडीयम विशेष आकर्षणाचा विषय बनले आहे. हे स्टेडीयम तात्पुरत्या स्वरूपाचे आहे आणि स्पर्धा संपली कि हे स्टेडीयम सुटे करून हलविले जाणार आहे. हे स्टेडियम ९७४ शिपिंग कंटेनर्सपासून बनविले गेले आहे. आर्किटेक्चर आणि इनोव्हेशनचा उत्तम नमुना म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. कतार मध्ये या स्पर्धेत एकूण आठ स्टेडीयम मध्ये सामने खेळले जाणार आहेत. त्यातील हे एक स्टेडीयम असून फिफा इतिहासात प्रथमच असे स्टेडीयम बनविले गेले आहे.

फेन्विक इरीबेरेन यांनी या स्टेडीयमचे डिझाईन केले आहे. यासाठी छोटे कंटेनर वापरले गेले आहेत. दोहाच्या रस अबू अबद या जागी हे स्टेडीयम उभारले गेले असून ते ४५०,००० चौरस मीटर जागेत आहे. मोड्युलर आकाराच्या या स्टेडीयमचे नाव ९७४ स्टेडीयम असेच ठेवले गेले आहे. विशेष म्हणजे त्यासाठी ९७४ कंटेनर वापरले गेले आहेत तसेच कतारचा आंतरराष्ट्रीय फोन डायल सुद्धा ९७४ आहे.

हे स्टेडीयम बनविण्याचे काम २०१७ मध्येच सुरु झाले होते आणि २०२१ मध्ये ते पूर्ण झाले. येथे एकूण आठ सामने खेळले जाणार आहेत. हे स्टेडीयम स्पर्धा सुरु होण्यापूर्वी विवादात सापडले होते कारण ब्रिटनच्या गार्डियन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार हे स्टेडीयम तयार करताना ६५०० मजूर मृत्युमुखी पडल्याचा आणि हे मजूर भारत, नेपाल, श्रीलंका, पाकिस्तान व अन्य काही देशातील असल्याचा आरोप केला गेला होता. कतार सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या स्टेडीयमला फाईव्ह स्टार रेटिंग दिले गेले असून ते पूर्ण वातानुकुलीत आहे. येथे ४० हजार प्रेक्षक बसू शकतात. रंगीबेरंगी कंटेनर्स मुळे त्याला वेगळा लुक आला आहे.

स्पर्धा संपल्यावर हे स्टेडीयम सुटे करून उरुग्वे येथे नेले जाणार आहे. कारण २०३० च्या फिफा वर्ल्ड कपचे आयोजन उरुग्वे येथे होणार असून तेथे पुन्हा या सुट्या भागापासून स्टेडीयम उभारले जाणार आहे.