पोस्ट विभाग ड्रोनने करणार टपाल वाटप

भारत हा खेडोपाडी असलेला देश. येथे पोस्ट सेवा चांगली रुळली असली तरी आजही देशातील अनेक भागात टपाल पोहोचविणे हे मोठे काम आहे. २० व्या शतकापर्यंत वाळवंटी राजस्थान मध्ये दूरस्थ भागात टपाल पोहोचविण्यासाठी पोस्ट उंटांचा वापर करत असे तर खासगी पत्रे पाठविण्यासाठी कबुतरे होती. २१ व्या शतकात सुद्धा जेसलमेर, बाडमेर, जालोर अश्या दूरस्थ भागात वेळेवर टपाल पोहोचविणे हे पोस्टसाठी अवघड काम आहे. त्यामुळे पोस्ट विभागाने या भागात ड्रोनचा वापर करण्याचा प्रयोग सुरु केला आहे.

या वर्षी गुजराथच्या कच्छ भागात ड्रोन टपाल सेवेच्या चाचण्या घेतल्या गेल्या असून त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे आता वाळवंटी राजस्थानच्या जोधपुर पोस्ट परीमंडळला ड्रोन चाचण्या घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. या भागात १३ जिल्हे असून त्यात शेखावती, बिकानेर, हनुमान गढ यांचा समावेश आहे. पोस्ट आणि संचार विभागाने मिळून ड्रोन सेवा सुरु केली असून त्यासाठी टेकइगल या स्टार्टअप कंपनीने तयार केलेली ड्रोन वापरली जाणार आहेत.

गुजराथच्या भूज भागात या ड्रोननी ४६ किमी चे अंतर २५ मिनिटात पार करून टपाल डिलिव्हरी दिली आहे. राजस्थान मध्ये ड्रोनचा मार्ग, वेळ आणि उतरण्याची ठिकाणे निश्चित करून तश्या सूचना उपविभागाला दिल्या गेल्या आहेत. ड्रोन ठरल्या जागी आणि ठरल्या वेळी उतरणार आणि टपाल देणार आहे. त्यानंतर पोस्टमन हे टपाल घेतील आणि घरोघरी पोहोचविणार आहेत. यासाठी किती वेळ लागतो आणि किती खर्च येतो याचे अंदाज घेतले जात आहेत असे समजते.