हा निर्णय धक्कादायक-दिनेश कार्तिक

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाच्या सतत निराशाजनक कामगिरीमुळे निवडसमिती बरखास्त करण्याचा भारतीय क्रिकेट संघाचा निर्णय धक्कादायक असला तरीही भविष्याच्या दृष्टीने आशादायकही आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असलेल्या दिनेश कार्तिक याने व्यक्त केली आहे.

टी २० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यानंतर माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवडसमिती बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला आहे.

हा निर्णय धक्कादायक आहे. मात्र, या निर्णयामुळे येणाऱ्या नव्या निवडसमितीला नवे काही करून दाखविण्यास संधी मिळेल आणि ते भारतीय क्रिकेटच्या हिताचे ठरू शकेल, अशी आशा दिनेश कार्तिक याने क्रिकेटविषयक संकेतस्थळ प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

निवडसमितीत काम करणे हे जबाबदारीचे, आव्हानात्मक तरीही थँकलेस काम असते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या ४० – ४५ खेळाडूंच्या चमूमधून १५ खेळाडूंचा संघ निवडणे हे सोपे काम नाही, असेही दिनेश याने नमूद केले.

चेतन शर्मा यांच्या नेतृतवाखालील निवडसमितीने निवडलेल्या भारतीय संघाला सलग चार स्पर्धांमध्ये चषक मिळविण्यात अपयश आले आहे. कसोटी विश्वचषक २०२१, टी २० विश्वचषक २०२१, एशिया कप २०२२ आणि नुकतीच पार पडलेली टी २० विश्वचषक २०२२ या स्पर्धांमधून भारतीय संघाला हात हलवत परत यावे लागले. या स्पर्धांपैकी केवळ एका स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत जाता आले.